'चि व चि सौ का आणि मी'
आजच मी परेश मोकाशी दिग्दर्शित 'चि व चि सौ का' पाहून आले. उत्तम लेखन, दिग्दर्शन, अभिनय ,संगीत याची उल्लेखनीय सांगड असणारा हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीने केलेला एक नवीन प्रयोगच म्हणावा लागेल. मराठी माध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली सावि म्हणजेच सावित्री तिच्या 'मुलगी दाखवण्याच्या' कार्यक्रमात नवरदेवासमोर आणि त्याच्या घरच्यांसमोर मुलासोबत लग्नाआधी 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवते. आणि मग खर्या चित्रपटाला सुरुवात होते. या चित्रपटातून दोन मुद्दे ठळकपणे समोर येतात. एक म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप'सारखा पुरोगामी मुद्दा आणि दुसरा म्हणजे 'कोणतंही नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तडजोडी कराव्या लागतात आणि प्रेम खरं असेल की अशा तडजोडी आपोआप होतात', असा वरकरणी पारंपारिक वाटणारा आणि आधुनिक काळात ज्याची नितांत आवश्यकता आहे असा मुद्दा. हा चित्रपट म्हणजे निःशंक एक सुंदर कलाकृती आहे आणि म्हणूनच हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात विविध विचारतरंग उठले. ( माझ्या मते कोणतीही सुंदर कलाकृती आपल्या मनात खोल काहीतरी ढवळून काढते. आणि तिने तस...