रंगीत काचेची खिडकी...
रॉबिन शर्मा लिखित 'आपली आत्मशक्ती ओळखा' पुस्तक वाचत होते. पुस्तक खूप प्रेरणादायी आणि डोळ्यात अंजन घालणारं आहे, नवीन ज्ञान देणारं आहे, तमाकडून तेजाकडे नेणारं आहे. त्यातील एका प्रकरणाच्या नावाने मला आकर्षित केलं. ते नाव वाचून मला काही अंदाजच बांधता येईना की या प्रकरणात नेमकं काय लिहिलेलं असेल. प्रकरणाचं नाव होत - 'रंगीत काचेची खिडकी'. हे नाव मला खूप आकर्षक वाटलं आणि मी लागलीच ते प्रकरण वाचायला सुरुवात केली. प्रकरणाची मध्यवर्ती कल्पना अशी होती की प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच एक रंगीत काचेची खिडकी असते आणि आपल्यापैकी प्रत्येकजण त्या रंगीत काचेच्या खिडकीतूनच जगाकडे पाहात असतो. आपण बर्याचदा जग जसे आहे तसे पाहात नाही तर आपण जसे आहोत तसे जग आपल्याला दिसत असते. किती खर आहे हे, नाही का? तुम्ही कधी घेतलाय अनुभव याचा? आपण सुखी असलो, आनंदी असलो की जगही आपल्याला सुखी आणि आनंदी दिसत आणि आपण जर दुखी असलो तर जगही आपल्याला दुखी दिसत. आपण आजूबाजूला जे पाहात असतो ते आपल्या आंतरिक घडामोडीचं प्रतिबिंब असत. कोणीतरी म्हटलंच आहे, "सौंदर्य हे ते पाहणाऱ्याच्या नजरेत असत." खर आहे. बर्...