'चि व चि सौ का आणि मी'

आजच मी परेश मोकाशी दिग्दर्शित 'चि व चि सौ का' पाहून आले. उत्तम लेखन, दिग्दर्शन, अभिनय ,संगीत याची उल्लेखनीय  सांगड असणारा हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीने केलेला एक नवीन प्रयोगच म्हणावा लागेल.

मराठी माध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली सावि म्हणजेच सावित्री तिच्या 'मुलगी दाखवण्याच्या' कार्यक्रमात नवरदेवासमोर आणि त्याच्या घरच्यांसमोर मुलासोबत लग्नाआधी 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवते. आणि मग खर्या चित्रपटाला सुरुवात होते. या चित्रपटातून दोन मुद्दे ठळकपणे समोर येतात. एक म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप'सारखा पुरोगामी मुद्दा आणि दुसरा म्हणजे 'कोणतंही नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तडजोडी कराव्या लागतात आणि प्रेम खरं असेल की अशा तडजोडी आपोआप होतात', असा वरकरणी पारंपारिक वाटणारा आणि आधुनिक काळात ज्याची नितांत आवश्यकता आहे असा मुद्दा.

हा चित्रपट म्हणजे  निःशंक एक सुंदर कलाकृती आहे आणि म्हणूनच हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात विविध विचारतरंग उठले. ( माझ्या मते कोणतीही सुंदर कलाकृती आपल्या मनात खोल काहीतरी ढवळून काढते. आणि तिने तस खोल काहीतरी ढवळून काढणं हाच तिच्या सुंदरतेचा मापदंड आणि ओळख असते.)

मी पहिल्या मुद्द्याला प्रथम हात घालते - 'लिव्ह इन रिलेशनशिप'. 'लिव्ह इन रिलेशनशिप' ची गरज स्पष्ट करताना सावि एक सुंदर विधान करते. त्याचा आशय फार खोल आहे. त्या आशयाप्रमाणे,  आपण कोणतीही इतर वस्तू घेताना दहा वेळा ती पारखून घेतो पण लग्न करताना मात्र आपण तेवढी चाचपणी करत नाही. आणि 'लिव्ह इन रिलेशनशिप' हा आपल्या भावी जोडीदाराला समजून घेण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. एवढा पुरोगामी मुद्दा समोर मांडताना 'आम्ही दोघे 'रिलेशनशिप'मध्ये राहात असताना कोणतेही शरीर संबंध ठेवणार नाही, असही ती पुढे ठामपणे सांगते. 'लिव्ह इन रिलेशनशिप' च समर्थन करताना आणि त्याची गरज स्पष्ट करताना ती नमूद करते की आजकाल केवढ्या लहान लहान कारणांवरून घटस्फोट होत आहेत आणि त्याच कारण कोठेतरी आपण आपल्या जोडीदाराला लग्नाआधी पुरेस ओळखलेलं नसणं यात आहे. मला हा विचार निश्चितच कोठेतरी पटतो कारण आजकाल भरमसाट संख्येने होणाऱ्या घटस्फोटांमागे 'आपण आपल्या जोडीदाराला नात्यात प्रवेश करण्याआधी पुरेस ओळखलेलं नसत' यातच आहे.

पण मुद्दा असा उपस्थित राहातो की 'रील लाईफ'मध्ये  वगैरे  'लिव्ह इन रिलेशनशिप' सगळं चालून जात पण आपल्या 'रिअल लाईफ'मध्ये काय? आपल्या पिढीला हे कितीही पटलं,रुचलं ,भावलं तरी आपले पालक, आपले नातेवाईक आणि तथाकथित समाजपुरुष हे मान्य करेल का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि 'लिव्ह इन रिलेशनशिप' हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये प्रवेश करणारे दोघेही जण हे कमालीचे परिपकव आणि जबाबदार हवेत. जर दोन व्यक्ती खरंच विचार, भावना आणि कृतीने परिपकव आणि जबाबदार असतील तर आणि तरच 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये जाणं हितावह ठरू शकत, अन्यथा फार मोठं भावनिक नुकसान होण्याचा धोका यात आहे कारण पाहायला गेलं तर या प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये कोणतीही सुरक्षितता नाही.

मुळात 'लग्नसंस्था' ही निर्माण होण्यामागे कारणंच हे आहे की जोडप्याला आर्थिक, सामाजिक आणि भावनिक सुरक्षितता मिळावी आणि त्याच्यातील आदिम उर्मींवर समाजपुरुषाचा वचक आणि अंकुश राहावा. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की अद्यापही आपण आपल्या आदिम उर्मींवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो नाही आहोत आणि म्हणूनच आपल्याला 'लग्न संस्थेचा' आधार घ्यावा लागत आहे. यातून असा अजून एक विचार उत्सर्जित होतो की मग जर आपण आपल्या आदिम उर्मींवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो तर आपल्याला लग्नसंस्थेची गरजच भासणार नाही. पण आपल्या समाजाला ह्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठ्या वैचारिक, भावनिक आणि कृती पातळीवरील स्थित्यंतराची आवश्यकता आहे.

आता मी बोलते चित्रपटात मांडल्या गेलेल्या दुसर्या मुद्द्याबद्दल - नातं यशस्वी होण्यासाठी तडजोडी ह्या कराव्याच लागतात आणि प्रेम खरं असेल तर तडजोडी या आपसूक घडतात, त्या कराव्या लागत नाहीत. सावि ही वेगन दाखविली आहे आणि सत्यप्रकाश हा पर्यावरणप्रेमी दाखविला आहे. दोघांच्याही स्वभावात कमालीचं ध्रुवीकरण आहे. त्यांच्यात खटके उडतात, प्रसंगी वादही होतात पण अखेर प्रेमाचा, आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा  विजय होतो.

आज आपण आपल्या आजूबाजूला पहातो की बरेच ब्रेकअप्स होतात, लग्न तुटतात, पटत नाही म्हणून माणसे नाती तोडतात आणि बरच काही. पण आपण फक्त थोडीशी जरी तडजोड केली, आपल्या माणसांना समजून घेतलं, त्यांना भावनिक आणि मानसिक आधार दिला की तीच नाती अंतर्बाहय कशी खुलून जाऊ शकतात हे आपण समजून घेत नाही. नात्यांमध्ये अहंकार आला की नाती बिघडतात. अहंकाराऐवजी प्रेम, आपुलकी ,जिव्हाळा, विश्वास, आधार आला की नाती बहरतात. चित्रपटातसुद्धा सावि आणि सत्याचे बर्याच गोष्टींवरून वाद होतात. त्यांचे इगो दुखावले जातात, त्यांना त्यांच्या तत्वांना मुरड घालावी लागते पण त्यांच्यात जो प्रेमांकुर नकळत रुजला गेलेला असतो तो प्रेमांकुर तग धरतो आणि पूर्ण चित्रपटभर तो कळीकळीने खुलत जातो, जो त्यांच्याकडून आपणहून तडजोडी करून घेतो. हा फार मोठा संदेश आहे. 'प्रेम' हे ह्या सृष्टीचं आदी आणि अंतिम स्वरूप आहे. प्रेम असेल तर तुम्ही काहीही जिंकू शकता. स्वतःला गमवून स्वतःलाच नव्याने जिंकण्याची शक्ती प्रेम आपल्याला देत. ज्याला तडजोड करणं जमल त्याला प्रेम करणं जमलं. माणसे ही भिन्न भिन्न प्रवृत्तीची असतात. त्यात सदगुण आणि दुर्गुण दोन्ही असतात. पण आपल्या माणसांच्या दुर्गुणांकडे कधी दुर्लक्ष करून आणि कधी त्यांना सुधारून तसेच त्यांच्यातील सद्गुणांना पुरेस खतपाणी घालून त्यांना वृद्धिंगत कस करायचं हे जमल पाहिजे, मग आयुष्य सुंदर व्हायला वेळ लागत नाही.

'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये जाणारी सर्वच माणसे यांत्रिकी स्वभावाची, प्रेम-आपुलकी-जिव्हाळा यासंबंधी कोरडी असणारी किंवा ज्यांना फक्त नात्याच्या  नावाखाली शरीरसुख घ्यायच असत आणि ब्ला ब्ला अशी नसतात. काहीजणांना खरोखरीच केवळ समोरच्याला जाणून घ्यायचं असत आणि त्या व्यक्ती तडजोडीसाठीही तयार असू शकतात व अशी ही पुरोगामीपणाची आणि  पारंपारिक मूल्यांची खमंग सरमिसळ असू शकते ही शक्यता आज नव्याने समोर आली.

मुळात मला असं वाटतं की केवळ 'लिव्ह इन रिलेशनशिप' किंवा केवळ 'लग्न' असं  न असता 'लिव्ह इन रिलेशनशिप'कडे 'लग्न करण्याआधीची एक पायरी म्हणून बघितलं तर दोन्ही उभय संस्थामधील दोष बाजूला सारून आपल्याला दोहोंचे फायदे अनुभवता येतील.

परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी तुम्ही हाच विचार कोठेतरी चित्रपटातून पुढे केल्याबद्दल आणि इतकी सुंदर कलाकृती निर्माण केल्याबद्दल हार्दिक आभार...  

- दीप्ती शाम आरती शिंदे

 

Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"