"तुमची बकेट लिस्ट काय म्हणतेय ?"
'इच्छा तेथे मार्ग' असं आपण म्हणतो. खरंच आहे ते. पण कधीकधी इच्छांच्या आड कर्तव्यं येतात. कर्तव्यांचं पारडं जड होतं आणि इच्छांना मुरड घालावी लागते आणि परिणामी इच्छा अपूर्ण राहतात. भारतासारख्या देशातील स्त्री - पुरुषांच्या बाबतीत आणि त्यातही स्त्रियांच्या बाबतीत हे फार प्रकर्षाने दिसून येतं कारण आपण सामुदायिक जीवनशैलीला महत्त्व देणार्या समाजात राहतो. त्यामुळे आपल्याकडील बर्याच जणांनी आपापल्या स्वप्नांचा आपल्या घरच्यांसाठी किंवा इतर नातेवाईकांसाठी किंवा अजून इतर कोणासाठी बळी दिल्याचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. स्त्रियांच्या बाबतीत तर हे अधिक प्रमाणात दिसून येत. भारतासारख्या देशांतील स्त्रियांच्या बाबतीत तर दोन दोन घटक त्यांच्या स्वप्नांची, इच्छा-आकांक्षांची गळचेपी करण्यात आपली भूमिका बजावताना दिसतात - सामुदायिक जीवनशैली आणि पुरुषप्रधान संस्कृती. एकूण काय, जगाच्या पाठीवर बहुसंख्य लोकांच्या अनेक इच्छा-आकांक्षा अपूर्ण राहतात. त्यापैकी दोन महत्त्वाची कारणं वर उल्लेखलेली आहेत पण अजूनही काही कारणं आहेत. उदाहरणार्थ, काही काही जणांना लहानपणापासून सतत सहन करावी लागण...