घेशील ना माझी काळजी?
"हॅलो, कसा आहेस? खूप दिवस झाले, तुझ्याशी बोलणं नाही झालं माझं. म्हणून आज मुद्दाम पत्र लिहायला घेतलंय. तुझ्याशी बोलण्याचा खूप दिवस माझा प्रयत्न चालू आहे पण तू व्यस्त आहेस,तुझ्या रोजच्या धावपळीत. आणि तुझ्या दगदगीच्या आयुष्यात असं तुला डिस्टर्ब करणंही मला पटत नाही. खरं तर खूप बोलायचं आहे, सांगायचं आहे मला तुला. पण कसं सांगावं, काय सांगावं आणि किती सांगावं हेच उमजत नाहीये. बऱ्याच दिवसांनी एखाद्याशी बोलायला गेल्यावर कधीकधी आपले आपल्यालाच शब्द सापडत नाहीत, तसंच काहीसं माझं झालंय. तसा तू काही मला परका नाहीस... पण... असो... माझं ना, एक निरीक्षण आहे. तू ना आजकाल मला आधीसारखा - म्हणजे लहानपणी होतास ना - तसा आनंदात दिसत नाहीस रे. तुझ्या चेहऱ्यावर तू कसलंतरी अनामिक ओझं आणि त्रास घेऊन फिरत असतोस. तुझ्या चेहऱ्यावर निखळ आनंद मला दिसतंच नाही हल्ली. सतत कसली ना कसलीतरी भीती, नाहीतर त्रागा, शंका, तक्रारी आदींचा पेहराव असतो तुझ्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर. त्यादिवशी बाजूच्या रमाकांतच्या मुलाच्या परीक्...