"तुमची बकेट लिस्ट काय म्हणतेय ?"

'इच्छा तेथे मार्ग' असं आपण म्हणतो. खरंच आहे ते. पण कधीकधी इच्छांच्या आड कर्तव्यं येतात. कर्तव्यांचं पारडं जड होतं आणि इच्छांना मुरड घालावी लागते आणि परिणामी इच्छा अपूर्ण राहतात. भारतासारख्या देशातील  स्त्री - पुरुषांच्या बाबतीत आणि त्यातही स्त्रियांच्या बाबतीत हे फार प्रकर्षाने दिसून येतं कारण आपण सामुदायिक जीवनशैलीला महत्त्व देणार्या समाजात राहतो. त्यामुळे आपल्याकडील बर्याच जणांनी आपापल्या स्वप्नांचा आपल्या घरच्यांसाठी किंवा इतर नातेवाईकांसाठी किंवा अजून इतर कोणासाठी बळी दिल्याचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. स्त्रियांच्या बाबतीत तर हे अधिक प्रमाणात दिसून येत. भारतासारख्या देशांतील स्त्रियांच्या बाबतीत तर दोन दोन घटक त्यांच्या स्वप्नांची, इच्छा-आकांक्षांची गळचेपी करण्यात आपली भूमिका बजावताना दिसतात - सामुदायिक जीवनशैली आणि पुरुषप्रधान संस्कृती. 

एकूण काय, जगाच्या पाठीवर बहुसंख्य लोकांच्या अनेक इच्छा-आकांक्षा अपूर्ण राहतात. त्यापैकी दोन महत्त्वाची कारणं वर उल्लेखलेली आहेत पण अजूनही काही कारणं आहेत. उदाहरणार्थ, काही काही जणांना लहानपणापासून सतत सहन करावी लागणारी टीका , नोकरीधंद्याच्या ठिकाणी वरिष्ठ लोकांनी केलेली टीका किंवा सहाध्यायांनी/सहकाऱयांनी केलेली टिंगल टवाळी, प्रसारमाध्यमं/ समाजमाध्यमं, इतर काही प्रकाशित स्रोत इत्यादी माध्यमांतून बर्याचदा (सतत नाही) येणारी नकारात्मकता यामुळे मनावर नैराश्याचं मळभ दाटतं, मनं ध्येयापासून विचलित होतात,आत्मविश्वास खचतो. परिणामी माणसं आपली स्वप्नं विसरतात, त्यागतात आणि नंतर आयुष्यभर स्वतःला कोचत राहतात. 

माझं एवढंच म्हणणं आहे की काहीही परिस्थिती असो, आपण आपल्या इच्छा-आकांक्षांचा बळी देता कामा नये. अर्थात आपल्या इच्छा इतर कोणाच्या सुरक्षेवर आणि आनंदावर (खरोखर) गदा आणत नाही आहेत ना याचाही विचार करणं गरजेचं आहे. पण आपली स्वप्नं, आपल्या इच्छा आपण जरूर पूर्ण केल्या पाहिजेत. 

आपली इच्छा काहीही असू शकते, अगदी सायकल चालवता यावी इथपासून ते अगदी मोठा/मोठी उद्योगपती व्हावं इथपर्यंत काहीही. बऱ्याचदा आपल्यासाठी आपल्या आयुष्यातील लहान लहान इच्छाही मोठ्या इच्छांइतक्याच महत्त्वाच्या असतात. बऱ्याच जणांना वयाच्या चाळीशी पन्नाशीत जाणवतं की अरे आपण आपल्या ऐन तारुण्यात मित्र-मैत्रिणींबरोबर हवी तशी धम्मालच केली नाही आणि आता तर पन्नाशी आली, आता कसली मजा?, असा विचार मनात येतो आणि कैक वर्षांपूर्वी गळचेपी केलेल्या इच्छा-आकांक्षांचा परत नव्याने बळी दिला जातो. कर्तव्याच्या ओझ्यामुळे काही काळापर्यंत काहीकाही इच्छा पूर्तीस आपण नाही नेऊ शकत. मान्य. पण किमान जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे, सुरळीत आहे तेव्हा तरी किमान आपण आपल्या इच्छांची नव्याने विचारपूस करायला नको का आणि त्यांना पूर्ण करायला नको का? 

मी चंगळवादी संस्कृतीची आणि स्वैराचारी जीवनशैलीची पुरस्कर्ती मुळीच नाही. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की आपण ऐर्या गैऱ्या कारणांसाठी तरी आपल्या स्वप्नाना तिलांजली देऊ नये. या पृथ्वीवर आपण ठराविक कालावधीसाठीच आहोत. अर्थात आपल्यापैकी बहुतेकजण आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. पण याचा अर्थ असा नाही ना की ज्या इच्छा या जन्मात पूर्ण होऊ शकतात त्याही आपण पुढच्या जन्मासाठी राखीव ठेवाव्यात?  
आयुष्याचा एकमेव हेतू आहे आनंद निर्माण करणं, अनुभवणं आणि तो इतरांना वाटणं. आणि जर आपण आपली स्वप्नं पूर्ण केली , इतरांच्या स्वप्नपूर्तीला हातभार लावला तर आपण सर्व आनंदाचाच अनुभव घेणार आहोत ना? आणि आयुष्यात स्वप्नच नसतील तर जगण्यात तरी काय मजा आहे? आपण आपापल्या परीने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायचा. आपले १००% द्यायचे. प्रामाणिकपणाने मेहनत घ्यायची. यश देणारी ती आदिशक्ती तर सदैव आपल्या पाठीशी आहे. 

मग कशाला उगाच इच्छा मारायच्या? आपली स्वप्नं ही आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग असतात. त्यांच्या पूर्ततेतून आपल्याला आपल्या अंतिम ध्येयाकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण जे काही करतो त्या सगळ्यांतून आपल्यातील सुप्त गुणांचा अविष्कार होत असतो, आपण समृद्ध होत असतो, आपण शिकत असतो, नवीन काहीतरी अनुभवत असतो, नवीन काहीतरी जगत असतो. मग हे नवीन अनुभव का बरं आपण घेऊ नयेत? 

मग काय, तुमची बकेट लिस्ट काय म्हणतेय? 

- दीप्ती शा. आ. शिंदे 


Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"