घेशील ना माझी काळजी?

"हॅलो, 

कसा आहेस? 

खूप दिवस झाले,  तुझ्याशी  बोलणं नाही झालं माझं. म्हणून आज मुद्दाम पत्र लिहायला घेतलंय. तुझ्याशी  बोलण्याचा खूप दिवस माझा प्रयत्न चालू आहे पण तू व्यस्त आहेस,तुझ्या रोजच्या धावपळीत. आणि  तुझ्या दगदगीच्या आयुष्यात असं तुला डिस्टर्ब करणंही मला पटत नाही.

खरं तर खूप बोलायचं आहे, सांगायचं आहे मला तुला. पण कसं सांगावं, काय सांगावं आणि किती सांगावं हेच उमजत नाहीये. बऱ्याच दिवसांनी एखाद्याशी बोलायला गेल्यावर कधीकधी आपले आपल्यालाच शब्द सापडत नाहीत, तसंच काहीसं माझं झालंय. तसा तू काही मला परका नाहीस...  पण... असो... 


माझं ना, एक निरीक्षण आहे. तू ना आजकाल मला आधीसारखा - म्हणजे लहानपणी होतास ना - तसा आनंदात दिसत नाहीस रे. तुझ्या चेहऱ्यावर तू कसलंतरी अनामिक ओझं आणि त्रास घेऊन फिरत असतोस. तुझ्या चेहऱ्यावर निखळ आनंद मला दिसतंच नाही हल्ली. सतत कसली ना कसलीतरी भीती, नाहीतर त्रागा, शंका, तक्रारी आदींचा पेहराव असतो तुझ्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर. 

त्यादिवशी बाजूच्या रमाकांतच्या मुलाच्या परीक्षेचा निकाल लागला. त्याच्या मुलाला ८५% मिळाले आणि तुझ्या पिंट्याला ७८% मिळाले. त्यावरून किती ओरडलास तू पिंट्याला ! अरे, हाताची सगळी बोटं सारखी नसतात हे काय मी तुला नव्याने सांगायला हवं? विलासने काही दिवसांपूर्वी  ३ बीएचके फ्लॅट घेतला तर तुझा  २ बीएचके तुला अचानक लहान वाटायला लागला. का अशा अविवेकी आणि निरर्थक अपेक्षा आणि स्पर्धाभावात गुंतला आहेस? माणसाने महत्त्वाकांक्षी असावं पण इतकंही नाही की त्याला त्याच्याजवळ जे आहे त्याचा नीट आनंदही उपभोगता येऊ नये. सुखाची आणि आनंदाची काय व्याख्या आहे तुझी? प्लीज, जरा पुन्हा तपासून पाहतोस का? 


गेल्या महिन्यात ऑफिसमध्ये बॉस ओरडला तुझा, कामात काहीतरी चूक झाली म्हणून. आणि घरी येऊन सगळा राग बायकोवर काढलास. तुला अचानक सगळं चुकीचं आणि वाईटच दिसायला लागलं. जणू आयुष्यात सगळंच चुकत आहे असा भास व्हायला लागला तुला. भासच म्हणेन मी. कारण तो भासच आहे. अरे, आयुष्यात सगळं काही एकदम व्यवस्थित आणि सगळं काही एकदम चुकीचं असं नसतंच रे मुळी. या 'ऑल आणि नन'च्या जाळ्यातून कधी बाहेर पडणार तू? 

ही फक्त काही थोडी, आजकालची उदाहरणं झाली. अजून अशा माझ्या बऱ्याच तक्रारी आहेत तुझ्याबद्दल. तुझ्यावरचा वाढलेला षड्रिपूंचा  प्रभाव, वाढलेली अशांतता, स्पर्धाभाव, कलुषित विचार यांचं काय करावं मला कळत नाही. आणि याचा मला त्रास होतो रे. कारण ह्या सगळ्या गोष्टी थेट माझ्याशी संबंधित आहेत ना? आणि या सगळ्यांचा तुझ्या शरीरालासुद्धा किती बरं त्रास होतो! 

का असं वागतोस रे, ज्याने मला त्रास होईल? मला नावलौकिक, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, लोकप्रियता या सर्वांहून अधिक शांतता हवी आहे. आणि तीच तू मला मिळून देत नाहीस. मग मला त्रास होणार नाही का रे. आपलं नातं एवढं जवळचं आहे की तू केलेल्या प्रत्येक गोष्टीचा माझ्यावर परिणाम होतो. तू सुखी तर मी सुखी आणि मी सुखी तर तू सुखी. आपण दोघे वेगळे आहोत का रे? नाही ना? मग माझी काळजी घे ना जराशी तरी. म्हणजे माझं अस्तित्व तुला, तुझ्या इंद्रियांना दररोज जाणवत नसलं तरीही मी तुझ्याचसोबत आहे ना? तुझ्यासोबत, तुझ्या अवतीभोवती, तुझ्या आत... 

घेशील ना माझी काळजी, माझ्या प्रिय मनुष्या? 

तुझंच मन..."

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

दीप्ती शा. आ. शिंदे 





Comments

  1. Crude reality.... I feel sometimes in this world today we actually are confused souls, we are in search of something which we think we don't have it. We believe when we reach on top, we are winners. In this competitive world we forget that there's no need to compete everywhere. Once in a while in life we can just lay back and relax.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"