विसंगतता
विसंगतता
संध्याकाळची साधारण आठ - साडे आठची वेळ असावी . मी ऑफिसमधून घरी येत होते . ट्रेनचा प्रवास. सांताक्रुजपासून चौथ्या स्टेशनवर - जोगेश्वरीला उतरायचं म्हणून मी दरवाज्यापाशीच उभी होते . काळोखामुळे बाहेरच बऱ्यापैकी स्पष्ट दिसत नसतानाही मी मस्त हवा खात बाहेर न्याहाळत होते .
विले पार्ले स्टेशनला दोन मुली चढल्या आणि त्यांच्याबरोबर तीन लहान मुले होती . लहान म्हणजे असतील पाचवी सातवीतील. त्या लहान मुलांपैकी दोन मुले होती आणि एक मुलगी होती. असा पाच जणांचा समूह होता तो .
मोठ्या मुलींमधील एक मुलगी - एक 'ताई' डब्ब्याच्या लोखंडी दांड्याजवळ आली आणि त्याला खिळून उभी राहिली . भुरभुरणारे केस सावरत , वाऱ्याच्या पाठीवर स्वैर झालेल्या, आपल्या उजव्या खांद्यावरील ओढणी सावरत ती उभी होती . दुसरी 'ताई' माझ्या अगदी समोर उभी होती . त्यां तीन लहान मुलांपैकी एक मुलगा हे सगळ पाहता होता आणि मीही .
आपली ताई लोखंडी दांड्याला धरून उभी राहून बाहेरची जलद गतीने धावणारी दृश्य पहातेय , छान हवा खातेय , हे पाहून तो लहान मुलगाही पुढे जाउ लागला . हा छोटू पुढे येतोय हे पहाताच ती 'ताई ' त्याच्यावर आवाज चढवून ओरडू लागली. " यहा आनेका नहीं। समझा ना ? कुछ हो गया तो ? … पीछे जा। पीछे खड़ा रह। " मी त्या मुलीचे शब्द ऐकत होते . तिच्या चेहर्यावरचे हावभाव बघत होते . लहान मुलगा शांतपणे काहीही न बोलता निमूटपणे मागे झाला पण त्या 'ताईच ' लक्ष पुन्हा बाहेर जाताच पुन्हा पुढे येऊ लागला . त्याची 'ताई ' पुन्हा ओरडली . तो पुन्हा मागे झाला. हा सगळा प्रकार मी पहात होते . एव्हाना माझ्या डोक्यात काही विचार समांतरपणे चालू झाले होते .
ही मुलगी लहान मुलाला सांगतेय की तू ट्रेनच्या लोखंडी दांड्याजवळ नको येउस आणि स्वतः मात्र तिथेच उभी आहे . त्या लहान मुलाला काय बर वाटत असेल या क्षणाला ? जी ताई आपल्याला पुढे नको येउस अस म्हणतेय तीच पुढे उभी आहे. पुढे उभ राहाण एवढच जर धोकादायक असेल तर ती पण अस का वागतेय. तिच्या शब्दात आणि कृतीत एवढ अंतर का बर असाव ? माझ्या एक नियम आणि तिच्यासाठी एक नियम ? अस का बर असाव ? असाच काही त्या लहानग्याच्या मनात तर आल नसेल ना ? माझे विचार चालूच होते.
शेवटी न रहावून मी त्या मुलीला म्हटलं, " आप बच्चेको कह रही हो की बाहर मत खड़ा रह खड़ी हैं. आपको देख ही शायद उसको ज्यादा इच्छा हो रही हो आपके यहाँ खड़ा होनेकी।" माझ्या या वाक्यांवर ती मुलगी अलगद हसली . आणि काही न बोलता मागे आली. अंधेरी स्टेशन आल आणि ती मुलगी आणि बाकीचे चार जण अंधेरीला उतरले . आता मी बोलल्यामुळे ती मुलगी मागे झाली का तिला अंधेरीला उतरायचं होत म्हणून ती मागे झाली हा संशोधनाचा मुद्दा होवू शकतो. असो .
मला राहून राहून इथे अल्बर्ट ब्यान्डूराची observational learning ची थिअरी आठवते. लहान मुल शेवटी मोठ्यांच अनुक्र करत असतात. मोठ्यांच्या शब्दांच, वागणुकीच , कृतींच लहान मुलांकडून काळात किंवा नकळत नेहमीच अनुकरण होत असत . कधी कधी - कधी कधी काय अगदी बर्याचदा मोठी माणसे जे बोलतात त्यात आणि ते जी वागतात त्यात जमीन आकाशाचं अंतर असत . अशा वेळेला लहान मुलाना उमगत नाही की नेमक काय आणि कस वागायचं. मोठ्यांच्या कृतीला प्राधान्य द्यायचं कि त्यांचे शब्द अनुसरायाचे. अशा वेळी लहान मुलांच्या मनात वैचारिक गोंधळ उडतो आणि लहान मुलांची त्या गोंधळानुसार कृती होते. लहानपणापासून मुलांच्या भोवताली असच म्हणजे विसंगत वातावरण असेल कि ज्यात लहान मुलांचा वैचारिक गोंधळ उडू शकतो , हे वागाव की ते वागाव तर अशा मुलांच्या निर्णयक्षमतेवर, त्यांच्या जडणघडणीवर एकूणच परिणाम होतो . पहायला ही फार बारीक सारीक गोष्ट वाटेल पण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पालकांनी आणि एकूणच सर्वानी लक्षात ठेवावी अशी बाब आहे. आपण यावर नक्की विचार करायला हवा आणी त्यानुसार लहान मुलांसमोर वागायला हवे.
Comments
Post a Comment