परि अमृतातेही पैजा जिंके...

आज जागतिक मराठी भाषा दिन. 

सकाळपासून बऱ्याच ग्रुप्सवर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. तसाही तो दरवर्षी होतंच असतो. या दिनाची आठवण असते हे पाहून बरं  वाटतं पण नंतर खंत वाटून राहते की या दिनाची ही आठवण,  मातृभाषा प्रेम फक्त याच दिवसापुरतं मर्यादित राहातं तेव्हा. असं का होतं ? 

मराठी भाषा दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या इंग्रजीतून शुभेच्छा देणारेही मी पहिले आहेत. असं का बरं होत? आपण आपल्या भाषेचा मान का बरं राखू शकत नाही? अर्थात मराठी भाषेचे अगदीच वाईट दिवस चालले आहेत असं निराशाजनक चित्र मला रंगवायचं नाही. कारण तसं खरंच नाहीये पण मराठीचे चांगले दिवस चालू आहेत असंही मला ठामपणे म्हणता येत नाही. 

ट्रेनमधून प्रवास करताना दोन मराठी प्रवाशांनासुद्धा चक्क हिंदी किंवा सर्रासपणे इंग्रजीतून बोलताना मी पाहिलं आहे, ऐकलं आहे. बऱ्याच मातांना त्यांच्या २-३ वर्षांच्या मुलांशी इंग्रजीतून बोलताना मी ऐकलं आहे. मी इंग्रजी बोलण्याच्या विरोधात नाही. इंग्रजी आलंच पाहिजे. कारण ती आज जागतिक आणि ज्ञानभाषा आहे. त्यामुळे आपलं इंग्रजी पक्क असणं नितांत गरजेचं आहे. इंग्रजी बोललंच पाहिजे पण ते आपल्या मातृभाषेचा बळी देऊन नाही. 

तुम्ही म्हणाल,"  आम्ही कोठे मराठीचा बळी देतो? आम्ही बोलतो की राव मराठीत." पण 'कोठे' सांगा. तर फक्त 'घरात'. आपण ट्रेनमध्ये, बसमध्ये, टॅक्सीवाल्याशी, रिक्षावाल्याशी इंग्रजी किंवा हिंदीतूनच संभाषण करतो ना? तुम्हीच काय मीसुद्धा कधी कधी अनावधानाने प्रवासात हिंदी किंवा इंग्रजी बोलते. पण याचीच खंत वाटते की हे आपल्या अंगवळणी पडलय. आपण असा विचार करतो की समोरच्याला मराठी येत नसेल किंवा तो अमराठी असेल तर त्याला आपलं बोलणं कळणार नाही आणि आपला मुद्दा त्याला कळणारच नाही. अर्थात यात काही गैर नाही. असा विचार माणुसकीलाच धरून आहे. पण प्रत्येक वेळी असा विचार आपल्या मातृभाषेसाठी, आपल्या राजभाषेसाठी घातक ठरू शकतो. पण मग अशा पेचात करायचं काय? आपण एक युक्ती करू शकतो. आपण सुरुवातीला मराठी वाक्य बोलायचं आणि नंतर जर समोरच्याच्या चेहऱ्यावरून किंवा प्रतिक्रियेतून कळलं की त्याला आपलं मराठी बोलणं समजलेलं नाहीये तर मग तेच वाक्य त्याला हिंदी किंवा इंग्रजीतून सांगायचं. हे वागणं माणुसकीला धरूनही आहे आणि मातृभाषेच्या संवर्धनसाठीही उपयुक्त आहे. बघा ना म्हणजे सुरुवातीला आपण मराठीतून बोलल्याने समोरच्याच्या कानावर मराठी शब्द पडले आणि नंतरच्या हिंदीतील किंवा इंग्रजीतील रूपांतरामुळे त्याला त्याचा अर्थही कळला. 'लोकसत्ता'सारखं वृत्तपत्र अशाच प्रकारची एक क्लुप्ती वापरतं.  आपण सर्रासपणे वापरत असलेल्या इंग्रजी शब्दांसाठी लोकसत्तात मराठी शब्द लिहिलेले असतात आणि त्याच्या बाजूलाच त्याचा इंग्रजीतील भाषांतरित शब्द लिहिलेला असतो. यातून समोरच्याला मुद्दाही कळतो आणि भाषेचं संवर्धनही होत, आपण सर्रासपणे वापरात असलेल्या इंग्रजी शब्दांसाठीचे पर्यायी शब्दही समजतात. 

कोणाचाही दूरध्वनी आला की लगेच 'हॅलो' बोलण्याऐवजी 'नमस्कार' बोलणं, आपला दूरध्वनी क्रमांक मराठीतून सांगणं, बोलीभाषेत मराठी अंक वापरणं, आठवड्याच्या वारांची नावं घेताना ती  मराठीतून घेणं यांसारखे छोटे छोटे उपाय करूनही आपण आपापल्या पातळीवर मराठी वाचवू शकतो आणि टिकऊही शकतो. 

खर तर प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा फक्त मराठीचा नाहीये. इतरही भाषांच्याही अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. कारण इंग्रजीने सगळीकडेच आपलं साम्राज्य पसरवलंय. आणि प्रादेशिक भाषांची दुरावस्था खास करून आपल्याला  मिश्र लोकसंख्या असणाऱ्या शहरांत अर्थात ज्याला आपण कॉस्मोपॉलिटन म्हणतो अशा शहरांत जास्त पाहायला मिळते. सगळ्याच प्रादेशिक भाषा आपापल्या अस्तित्वाचा लढा देतायत. स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या मिश्र लोकसंख्येमुळे भाषांचही मिश्रण होणं नैसर्गिक आणि अटळ आहे पण माझ्या मते त्या त्या भागातील प्रादेशिक भाषा या टिकायलाच हव्यात. आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतातील सर्वच कॉस्मोपॉलिटन शहरे आपापल्या भाषा टिकवण्यासाठी झटतायत. याच धर्तीवर आपणही झटायला हवं. महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत आपल्याला मराठी टिकवून ठेवणं आज अधिक निकडीचं  झालंय कारण आपल्या भाषेशी आज फक्त इंग्रजीच नाही तर इतरही भारतीय भाषा स्पर्धा करतायत. मराठीच्या मुद्द्याला अनेक सामाजिक, राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पैलू आहेत. माझा माझ्या मातृभाषेच्या शक्तीवर, तिच्या अक्षय अस्तित्वावर पूर्ण विश्वास आहे. कारण साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीचं वर्णन ' अमृतात पैजा जिंकणारी' असं केलंय... त्यामुळे मराठीला मरण नाही, ती अक्षयच आहे, अमरच आहे हे निर्विवाद सत्य आहे पण म्हणून 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' या उक्तीला शोभेल असं वागून तिच्यावर इतर भाषांचं आक्रमण होऊ द्यायचं आणि आपण पोकळ भाषाप्रेम मिरवत राहायचं याला अर्थ नाही. त्यामुळे मराठी जपण्यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्न करण हे नितांत गरजेचं आहे. 

( माझे विचार आणि भावना व्यक्त करताना, ते वाचत असताना कोणाच्याही हृदयाला जरासाही क्लेश झाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. माझा इतर बोलींवर जरासाही क्रोध नाही किंवा त्यांचा माझया हृदयी द्वेष नाही. मला केवळ एवढच वाटत की प्रत्येकाने आपापली भाषा जपावी आणि वृद्धिंगत करावी पण  तिच्यावरील प्रेमामुळे कोणावर अन्याय होऊ देऊ नये किंवा त्यातून कोणतंही राजकारण खेळलं जाऊ नये. )

- दीप्ती शा. आ. शिंदे

Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"