दुःखा दुःखा तुझे कारण तरी काय?

'सुखाचा शोध' घेत बसणं ही मानवी परंपरा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. प्रत्येक माणसाला सुख हवय. सुखापेक्षा अधिक चिरकाळ टिकणारा आनंद हवाय. प्रत्येक माणूस त्यासाठी धडपडतोय मग तरीही माणसे दुखी का आहेत. अशाच विचारांनी भारावलेल्या एका अस्वस्थ संध्याकाळी मी खिडकीत बसून होते. तेव्हा विचार आणि भावविश्वात उमटलेले हे तरंग...

माणूस दुखी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हे वाटत की तो स्वतःपासून तुटलाय.  जागतिकीकरणामुळे जग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक जवळ आलय पण माणसे आपल्या आप्तांपासून आणि मुळात स्वतः पासून दूर चालली आहेत. आज माणसाला आपल्या माणसांशी बोलायलाच वेळ नाहीये आणि अतीव दुःखाची आणि खेदाची बाब ही आहे की त्यांना स्वतः शीही बोलायला वेळ नाही.  आपण आपल्या विचारांवर आणि भावनांवर विचार करतच नाही कदाचित आजकाल. आपल्याला वेळच कोठे असतो म्हणा. एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला राग आला, वाईट वाटलं तर आपण त्यावर विचार करत नाही. आपण आजकाल त्या विचारांच्या आणि भावनांच्या मुळाशी , खोलात जात नाही. आपण त्या सर्व बाबींचा वरवर उथळ विचार करतो आणि परिस्थितीला व माणसांना लेबल्स लावून मोकळे होतो, दोष देऊन मोकळे होतो. आपल्याला डिस्टर्ब् व्हायला झालं की आपण त्या विचारांवर मात त्या विचारांपासून स्वतःच लक्ष विचलीत करून आपलं मन इतर गोष्टींत गुंतवून घेऊन करतो. ( चांगल्या गोष्टींत मन गुंतवून घेत असू तर ठीक आहे , चांगलं आहे पण जर चुकीच्या गोष्टींत मन गुंतवून घेत असू तर आगीतून फोफाट्यात जाण्यासारखच नव्हे का ? )  पण हे सप्रेशन ऑफ थॉट्स किती दिवस चालणार? जर आपल्याला खरंच आपल्या दुःखांवर किंवा अडचणींवर मात करायची असेल तर कधीना कधीतरी आपल्याला त्यांचा मुळाशी जाऊन विचार करायला हवाच ना. एकटं वाटतंय म्हणून फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यांवर रात्रंदिवस पडीक असणारी अनेकजण आपल्याला आजूबाजूला दिसतील. खूप अडचणी आहेत म्हणून व्यसनांच्या आधीन झालेले लोकही आपल्याला आजूबाजूला बरेच दिसतील. माझ्या हे सर्व सांगण्याचा मतितार्थ हा की माणूस स्वतः पासून दूर गेलाय. आपण स्वतः ला ओळखतच नाही. आपल्यातील सद्गुणांचा आणि दुर्गुणांचा आपल्याला पत्ताच नाही. आपण इतरांना तर ओळखणे आणि समजून घेणे दूरच पण आपण आजकाल स्वतः लाही ओळखत नाही. एखाद्या गोष्टीबाबत , परिस्थितीबाबत किंवा माणसाबाबत नेमका 'आपला स्वतःचा ' असा काय विचार आहे
हे आपल्याला ठाऊकच नसत. आपल्या विचारांवर आणि मतांवर आजूबाजूच्या माणसांचा, प्रचलित परंपरांचा, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा, प्रस्थापित शासनव्यवस्थेचा, जाहिरात आणि चित्रपटांतून पुढे येणाऱ्या विचार आणि मतांचाच अधिक प्रभाव असतो. दाही दिशांनी आपल्यावर विचार, दृष्टिकोन आणि  मतांचा मारा होत असतो आणि या सगळ्या कोलाहलात आपला - जो आपला स्वतः चा असा विचार आहे , मत आहे, दृष्टिकोन आहे तो झाकोळून जातो.

स्वतःपासून तुटल्याचा एक भयंकर परिणाम म्हणजे मनात 'स्पर्धाभाव' उमटण. आजूबाजूला आज स्पर्धायुग आहे. माणसे एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. ( अर्थात स्पर्धा आधी नसायच्या अशातली भाग नाही पण आजकाल स्पर्धा जरा जास्तच वाढल्या आहेत ). त्याला महिना ५०००० रुपये पगार आहे आणि आपल्याला २५००० च हजार रुपये पगार आहे. मग आपल्याला त्याचा हेवा वाटायला लागणार. हेवा वाटण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्या हेव्याच रूपांतर मत्सरात झालं की अधिक समस्या उद्भवतात. कारण मत्सर माणसाच वैचारिक, भावनिक आणि आत्मिक अधः पतन घडवत.  त्यामुळे मत्सराला वेळीच खणून काढणं हिताचं ठरत. स्पर्धाभावामुळे माणसामाणसांमध्ये दरी निर्माण होते. आणि जर ही दरी वेळीच प्रेमाने, आपुलकीने बुजवली नाही तर ती वाढतच जाते.

'स्पर्धाभाव' हा कोठेतरी 'अतिमहत्त्वाकांक्षे'शी निगडीत आहे. म्हणजे I feel there is a reciprocal relationship between competitiveness and tendency to be over ambitious. म्हणजे 'स्पर्धाभाव' असला की 'अतिमहत्त्वकांक्षा' निर्माण होतात आणि 'अतिमहत्त्वाकांक्षा' असली 'स्पर्धाभाव' निर्माण होतो. माणूस हा कधीच समाधानी नसतो. त्याला सतत नवीन काही ना काही तरी हवच असत. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की आता चांगला मोठा ३ बीएचके फ्लॅट घ्या. तो घेतला  की त्यात आता नवीन फर्निचर घ्या. ते घेतलं की त्यात आता त्यात सगळी नवीन आधुनिक उपकरणं घ्या. मी आधुनिक सुखसोयींचा, नवीन तंत्रज्ञानाचा उपभोग-आस्वाद  घेण्याच्या विरोधात मुळीच नाही. पण या उपभोगातून चंगळवाद निर्माण व्हायला नको, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि आज चंगळवादच वाढलाय. आपण समाधानी राहायला शिकायला हवं. अर्थात समाधानी होणं मी अल्पसंतुष्ट राहणं असं मला मुळीच म्हणायचं नाही. आणि अर्थात किती सुख मिळवलं की समाधानी किंवा अल्पसंतुष्ट हे आपल्याला काही ठोसपणे सान्गता नाही येणार. कारण समाधान, संतुष्टता या सर्व व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहेत.

माणूस दुखी असण्याचं मला अजून एक कारण वाटत की माणसांमध्ये आजकाल 'विश्वास' आणि 'धीर' उरलेला नाही. आजकाल आपल्याला प्रत्यत्येक गोष्टीच तात्काळ समाधान लागत. थोडासा काळ लोटला की फळ अधिक परिपक्व होईल आणि आपल्याला त्याची अधिक गोडी चाखता येईल असा विचार आपण आजकाल फार कमी करतो. आज युग फारच फास्ट झालं आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी झटपट व्हाव्या असाच वाटत आणि या मनोवृत्तेचे पडसाद आपल्या विचारविश्वावर, भावविश्वावर, नैतिक विश्वावर, वर्तनविश्वावर आणि नात्यांमध्येही उमटत आहेत. We are not letting the time to unfold the beauty of the things, people and situation. We want instant gratification if our impulses and instincts. And this is a mark of beginning of hedonistic culture.

आणि उपरोल्लेखित या सर्वच बाबींमुळे आपण निसर्गापासून मुळात खूप दूर गेलो आहोत याची खंत मला वाटते. दिव्यांची रोषणाई, वातावरण थंड करणारे कुलर्स आणि एसी, हाकेच्या अंतरावर जरी जायचं असेल तरी होणारा गाड्यांचा वापर,  होणार प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे शहराकडे होणार ग्रामवासीयांचं स्थलांतर, त्यातून उद्भवणाऱ्या समस्याच, नागरी सोयी सुविधांवर येणारा ताण, त्यातून होणारी अमाप जंगलतोड या सगळ्याचा आपल्या आजच्या अनुभवास येणाऱ्या अस्वस्थतेशी घनिष्ट संबंध आहे. आपण सूर्याची सकाळची कोवळी किरणे विसरलो आहोत, झाडांच्या हालचालींमुळे वातावरणात येणारा गारवा विसरलो आहोत, नदीच्या झुळझुळ वहाणार्या प्रवाहाचा थंडावा - त्याची शीतलता विसरलो आहोत. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या मनोवृत्तीनवर होत आहे.

वर नमूद केलेली सगळी कारणं आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहेत. आपल्या सगळ्यानांच माहीत आहे की आजच्या स्थितीला आपणसुद्धा कोठेनाकोठेंतरी कारणीभूत आहोत, कारण आपण सर्व मिळूनच तर हा समाज तयार जातो. पण आपल्यापैकी फार कमी माणसे अशी आहेत जी ही परिस्थिती बदलून सकारात्मक आणि हितावह बदल घडवून आणण्याचा विचार करतात आणि त्यानुसार उपाय शोधून ती अंमलात आणतात.पण आपण सर्वानीच ही  स्थिती समजून  योग्य ती पावले उचलली पाहिजेत आणि असं घडलं तरच आपण खर्या अर्थाने सुख आणि अधिक व्यापक अर्थाने म्हणायचं तर चिरकाल टिकणारा आनंद प्राप्त करू शकतो.

-दीप्ती शा. आ. शिंदे  

Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"