निंदकाचे घर असावे शेजारी...

आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला अशी माणसं भेटतात ज्यांना फक्त टीकाच करणं जमत,  जे लोकांच्या आणि परिस्थितीच्या केवळ तक्रारीच करत असतात. तस पाहायला गेलं तर आपल्यापैकी प्रत्येकजण दुसऱयांवर आरोप करण्यात, दुसर्याच्या तक्रारी करण्यात तरबेज असतो पण काही जण याबाबतीत अधिक तरबेज असतात. तुम्ही भेटला आहात कधी अशा माणसांना? हो? मग कशी वाटली तुम्हाला ही माणसं? काय भावना आणि विचार तुमच्या मनात निर्माण झाले, या माणसांमुळे? नक्कीच तुमचा अनुभव काही चांगला नसेल. नक्कीच तुम्हाला निराशा वाटली असेल, तुमच्याबाबत तक्रारी ऐकून तुमचही एका ठराविक पातळीपर्यंत का होईना पण कोठेतरी मानसिक खच्चीकरण झालं असेल, तुम्हालाही त्या माणसांचा राग आला असेल.  कदाचित स्वतः चाही राग आला असेल. तो राग कदाचित तुम्ही इतरांवरही काढला असेल आणि असं अजून बरच काही घडलं असेल... हो ना? मी समजू शकते... मलाही माझ्या आयुष्यात अशी काही माणसं भेटली आहेत ज्यांच्या तथाकथित अभिप्रायामुळे मलाही निराशा वाटली आहे, मलाही राग आला आहे आणि माझीही सहनशक्ती ताणली गेली आहे. तुम्ही, मी,  आपल्यापैकी प्रत्येकजण या प्रसंगातून आणि अनुभवातून गेला आहे. हो ना? मग अशा परिस्थितीत काय करावं?

अशा परिस्थितीत सापडल्यावर काही माणसं पुरती खचून जातात, नैराश्याला बळी पडतात, स्वतःवर -  स्वतः च्या क्षमतांवर संशय घ्यायला लागतात, त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो आणि बरच काही. पण काही माणसं याहून उलट परिणाम दाखवतात. ह्या माणसांचा आत्मविश्वास अधिक दुणावतो, ती अजून खंबीर आणि कणखर होतात, अधिक तेजाने तळपू लागतात. त्यांच्यावर झालेल्या टीकेला त्यांच्या कर्तृत्वाने चोख उत्तर देतात आणि स्वतःला सिद्ध करून दाखवतात. ही माणसं त्यांच्यावर फेकलेल्या आरोपरूपी, तक्राररूपी दगडांचा पूल करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. इथे मला राहून राहून आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच - सचिन तेंडुलकरचं वाक्य आठवत -" When people throw stones at you, you  turn them into milestone". किती प्रेरणाजनक आणि आशादायी आहे हे वाक्य ! नाही का? आपल्याला टीकाही पचवता आली पाहिजे आणि त्याचं रूपांतर यशात करता आलं पाहिजे.

टीका करणारी माणसं माझ्यामते दोन प्रकारची असतात - एक जी तुमच्या भल्यासाठी तुमच्यावर टीका करतात आणि एक जी तुमची टीका उगाचच, सहजच, फक्त त्यांना वाटलं म्हणून, त्यांना तुम्हाला खिजवायचं आहे म्हणून टीका करतात. या अशा दोन्ही प्रकारच्या टीका आपल्याला पचवट्या आल्या पाहिजेत. खरं पाहता, माणसांनी अभिप्राय द्यावा, टीका करू नये. पण 'टीकारहित आयुष्य' हे आदर्श चित्र आहे जे कदाचित परिकथेतच असू शकत. वास्तविक जीवनात प्रत्येकाला टीकेला कधीनाकधीतरी सामोरं जावंच लागत. आणि त्यात काही विशेष किंवा फार भयानक, गंभीर असं काही वाटून घेण्याची गरज नाही. अर्थात इथे मी टीकाकारांचं समर्थन करतेय अशातला  भाग नाही पण मला एवढच म्हणायचं आहे की 'टीकारहित आयुष्य' ही आपण आयुष्याकडून करत असलेली एक अवास्तविक आणि अवाजवी अपेक्षा आहे. त्यामुळे टीकेला हसत हसत सामोरं जाण्यातच खर शहाणपण आहे.

 टीका आयुष्यात आल्यावर तिच्याकडे आधी तठस्थपणे आणि नंतर सकारात्मकपणे पहाता आलं पाहिजे. मुळात आपल्यावर जी टीका होतेय तिच्यात तथ्य कितपत आहे हे आधी आपण  पडताळून घ्यायला हवं. टीका झाल्याझाल्या त्यावर लगेच भावनिक प्रतिक्रिया ना देता स्वतः ला विचारायला हवं की," ही टीका योग्य कारणासाठी होत आहे का?" आणि जर कारण योग्य असेल तर मग आपण आपल्या वागण्यात किंवा कृतीत सुधारणा घडवून आणण्याची तयारी दाखवायला हवी आणि सुधारणा करायला हवी. या वेळेस टीका  करणाऱ्या व्यक्तीने कशी टीका केली, किती अमानवीरित्या केली किंवा किती वाईटरीत्या केली ह्या बाबी थोड्या कालावधीसाठी गौण ठरवायला हव्यात आणि टीकेला आपण आपल्याकडून कस सकारात्मकरित्या आणि विधायकरीत्या उत्तर देऊ शकतो याचा विचार करायला हवा. माझ्यावर टीका होऊच कशी शकते, किंवा मी चुकूच कसा/कशी शकतो/ शकते हे विचार निरुपयोगी आहेत. हे विचार आपल्याला कोठेच घेऊन जाऊ शकत नाहीत. यापेक्षा 'मी कोठे चुकलो/ चुकले आणि मी या टीकेला कशाप्रकारे उत्तर द्यायला हवं?" हा प्रश्न स्वतः ला विचारायला हवा. आपण अशा वेळेला आपलं मानसिक खच्चीकरण कदापि होऊ देता कामा नये. भग्वदगीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे आपलं आपल्यावर नियंत्रण असत आणि असायला हवं, इतरांवर नाही. त्यामुळे टीका करणारे टीका करतील पण आपण त्यांना फक्त आपल्या सकारात्मक आणि विधायक कृतीतून उत्तर द्यायला शिकल पाहिजे. त्यातच खरं कर्मकौशल्य आहे, नाहीतर टीकेचा आणि आरोपांचा चेंडू या कोर्टातून त्या कोर्टात केवळ टोलवला जात राहातो आणि हाताला काहीच गवसत नाही.

आपण फक्त आपल्या बाजूने १०० टक्के सकारात्मक आणि विधायक योगदान देण्याचा प्रयत्न करत राहायचं. समोरचा माणूस कसा आणि आणि काय प्रतिक्रिया देईल हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. त्यात आपण ढवळाढवळ करू नये. मी एवढच म्हणेन की टीका झाली तर ती पचवता आली पाहिजे आणि तिला आपल्यापरीने यथाशक्ती, यथाबुद्धी चोख आणि योग्य उत्तर योग्यरीत्या देता आलं पाहिजे.

सरतेशेवटी एक उदाहरण द्यावासा वाटतंय जे मी कोठेतरी वाचलेलं का ऐकलेलं - 'बटाटा आहे आणि चहापावडर आहे. दोघांनाही गरम - उकळत्या पाण्यात टाकलं. थोड्यावेळाने बटाटा पूर्णपणे मऊसर झाला. त्याची साल पटापट निघू लागली. त्याला सहजपणे कुस्करता आलं पण चहापावडर, ती मात्र त्या उकळत्या पाण्यात अशी काही मिसळून गेली की तिचा सुगंध उकळत्या पाण्यात उतराला आणि उकळत्या पाण्याला 'चहा'ची ओळख मिळाली. आपलं अस्तित्वही असच असावं. आपल्याला कोणत्याही माणसासमोर उभं केलं किंवा परिस्थितीत टाकलं तर आपल्याला बटाटा होऊन स्वतः ला कुस्करून घेता कामा नये, तर आपल्याला चहाप्रमाणे आपल्यातील सुगंध पसरवता आला पाहिजे...'.  


काळजी घ्या.

- दीप्ती शा. आ. शिंदे


Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"