तुम्हाला कोण व्हायचंय?
आपल्यापैकी प्रत्येलाला लहानपणी अशी विचारणा झालेली असते की तुला मोठेपणी काय किंवा कोण व्हायचंय. आणि आपल्यापैकी प्रत्येकानेही आपापल्या परीने या प्रश्नाच उत्तर दिलेलं असतं." मला डॉक्टर व्हायचंय","मला इंजिनीअर व्हायचंय"," मला शिक्षक व्हायचंय" या रूढीपरंपरेने चालत आलेल्या विधानांमध्ये कधीकधी "मला अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय","मला पायलट व्हायचंय" अशीही विधानं चमकून जातात. डॉक्टर म्हणजे काय, इंजिनीअर म्हणजे काय किंवा इतरही अमुक अमुक म्हणजे काय हे पूर्णपणे माहीत नसतानाही एवढ्या लहान वयात आपल्याला असं कसं वाटतं की मला अमुक अमुक व्हायचंय? उत्तर तसं सोपं आहे. आपण हे सगळं निरीक्षणातून शिकतो. आपल्याला माहित असलेल्यांपैकी कोणीतरी डॉक्टर असतं, कोणीतरी इंजिनीअर असतं, कोणीतरी माधुरी किंवा दीपिकाचे डान्स परफॉर्मन्सेस पाहिलेले असतात. भलेही आपल्याला नेमकं कळत नसलं की ही माणसं काय करतात पण आपल्याला त्यांच्यामधील काहीतरी भावलेलं असतं. अर्थात आता आपल्याला काय भावतं किंवा भावावं हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असतं. इथे मी 'संस्कार' हा शब्द आपल्या घरातील वडीलधारी मंडळी जे काही आपल्याला बसून शिकवतात, चार समजूतदारपणाच्या गोष्टी सांगतात, फक्त त्यांनाच म्हणत नाहीये. तर इथे मी 'संस्कार' हा शब्द त्या प्रत्येक ठश्याला संबोधून उच्चारत आहे जो आपल्या मनावर आपण समाजाच्या केलेल्या निरीक्षणातून, त्यातून कळत नकळत शिकलेल्या धड्यांतून उमटत असतो. आजकालच्या जगात 'संस्कार' हे फक्त घरच्यांनी केले तरच होतात अशातला भाग उरलेला नाहीये. माहितीस्फोटाच्या, समाजमाध्यमांच्या या युगात लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकांवर क्षणाक्षणाला संस्कार होत आहे, चांगला - वाईट दोन्ही प्रकाराचा. आणि आपण तो थांबवू शकत नाही आहोत.
आज समाजमाध्यमांमुळे प्रत्येकजण एकमेकांचं अनुकरण करू लागलाय. गेल्या काही काळापर्यंत ज्या सेलिब्रेटीजच्या एका फोटोसाठी आपल्याला रोज वर्तमानपत्रं चाळायला लागायची त्याच सेलिब्रेटीजचे फोटोज आज आपल्याला गूगलवर किंवा आपल्या फेसबुक अकाऊंटवर, इन्स्टाग्रामवर सहज उपलब्ध होतात. जे कोणी आपले तथाकथित आदर्श आहेत किंवा जे आदर्श नाहीदेखील आहेत त्यांच्या प्रत्येक विचार, भावना, मत, काम, यश-अपयश इत्यादींबद्दल आपल्याला अगदी सहजपणे आज माहिती मिळत आहे. आणि कळत नकळत आपण त्यांपैकी बव्हंशी गोष्टींचं अनुकरण करू लागलोय. अर्थात आपण चांगल्या गोष्टींचं अनुकरण करत असू तर चांगलंच आहे पण अनेकदा वाईट गोष्टींचं किंवा अगदी गरज नसलेल्या गोष्टींचंही अनुकरण केलं जातं. माणसं एकमेकांपासून प्रभावित होतात. त्याने हे केलं म्हणून मीपण हे करणार, हा स्पर्धाभाव आपल्याला आज जास्त पाहायला मिळतोय. आता अर्थात यात एकमेकांच्या कामापासून प्रेरणा घेऊनसुद्धा काहीतरी चांगलं काम करणं आलंच. पण सांगायचा मुद्दा हा की ह्या सगळ्या कोलाहलात आपण जाणतेअजाणतेपणी आपले 'आदर्श' निवडू लागलो आहोत आणि तद्वत वागायला लागलो आहोत. आपण खरंच एकमेकांकडून प्रेरणा घेत आहोत की फक्त प्रभावित होत आहोत, हा विचारमंथनाचा मुद्दा आहे.
त्यामुळे, आपण प्रत्येकाने आपापला आदर्श स्वतःहूनच हुडकून काढायला हवा आणि तो गाठायला हवा. खर तर , "मला अमुक अमुक व्यक्तीसारखं व्हायचंय." या विधानावर माझा तितकासा विश्वास नाहीये कारण कोणीही माणूस पूर्णपणे आदर्श असूच शकत नाही. आपल्याला फारात फार एखाद्या व्यक्तीतील काही गुण आवडू शकतात . त्यांकडे आपण आकर्षित होऊ शकतो आणि ते आपल्याला आत्मसात करावेसे वाटू शकतात पण ते आपल्यात उतरविण्याच्या आधी तास करणं आपल्याला साजेल का, झेपेल का ह्याचा सारासार विचार करणं निकडीचं आहे. आपल्याकडे म्हणतात ना, दुसऱ्याने सोन्याची साखळी गळ्यात घातली म्हणून आपण सुम्भाची दोरी बांधू नये, ते योग्यच आहे. अर्थात इथे आपण स्वतःला कमी लेखण्याचा मुद्दा नाहीये. पण आपण काय करायला हवं, कसं वागायला हवं अर्थात आपला 'आदर्श' काय, हे आपलं आपण सारासारबुद्धीने ठरवणं गरजेचं आहे. नाहीतर आपलं आयुष्य आपलं रहाणारच नाही. जर आपण आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या आदर्शांप्रमाणे न जगता इतरांच्या आदर्शाप्रमाणे जगलो तर ते आयुष्य आपलं राहिलंच कसं?
तुम्हाला काय वाटतं?
काळजी घ्या.
-दीप्ती शा. आ. शिंदे
Comments
Post a Comment