माणूस आणि संगणकीकरण...

मला अजूनही आठवतो तो दिवस, ज्या दिवशी मी माझी पहिली कविता केली होती. ती निसर्गावर होती. आणि तेव्हापासून माझा कागद आणि पेनासोबतचा प्रवास सुरू झाला तो आजतागायत चालू आहे आणि पुढेही राहील.

सुरुवातीच्या  दिवसांमध्ये मी वही किंवा डायरीतच लिहायचे. अजूनही अधून मधून लिहिते - अधूनमधून. कारण -आजकाल बऱ्याचदा संगणकावरच लिहिणं होतं - सॉरी, टाईप करणं होतं. जेव्हा मी पहिल्यांदा संगणकावर टाईप करायला सुरुवात केली तेव्हा मला फार गोंधळून जायला व्हायचं. म्हणजे कीपॅडवर ए नंतर बी का नसतो, एस का असतो, असे बालसुलभ प्रश्न मला पडायचे. पण हळूहळू कीपॅडशी दोस्ती झाली आणि लेखन ते टायपिंगचा प्रवास सुरू झाला. पण तरीही कागदावर लिहायची गंमत काही औरच, नाही का? आज आपल्याला संगणकावर पटापट टाईप करता येतं. नको ते खाडाखोडीशिवाय पुसून टाकता येतं. सॉरी, डिलीट करता येतं. हवं तेव्हा त्यात सुधारणा करता येतात.

असंच काहीसं पुस्तकांचंसुद्धा. आपण आपल्या लहानपणी पुस्तकं वाचायचो.  म्हणजे आजही वाचतो. पण आज पुस्तक वाचनापेक्षा ऑनलाईन पुस्तकं, लेख, कथा, कादंबऱ्या  वाचणं आणि लेखकाला समोरासमोर अभिप्राय देण्याऐवजी सोशल मीडियावर कमेंट्स पोस्ट करणं जास्त वाढलं आहे. नाही का? पण असं असलं तरीदेखील पुस्तकांचा खप काही कमी झाला नसावा कारण ग्रंथालयं आणि पुस्तकांची दुकानं आहेत अजून आपल्याकडे. पण  ऑनलाईन वाचनाचं प्रमाण वाढलं आहे हेही आपल्याला नजरेआड करता येणार नाही.

फोटोंचही तसंच झालं आहे. आधी आपल्याकडे ठराविक मर्यादेचे कॅमेरे असायचे. ज्याद्वारे पन्नास का कितीतरी एवढेच फोटो काढता यायचे. आणि मग ते डेव्हलोप करायला दिले जायचे. मग ते परत आपल्या हातात छान अल्बमच्या रूपात येईपर्यंत आपली उत्कंठा जी शिगेला पोहोचलेली असायची, ती कसली भन्नाट असायची ! आणि आता मात्र आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये हवे तितके फोटो काढता येतात, हवे तितके फोटो सेव्हही करता येतात आणि नको असलेले डिलीटही करता येतात आणि त्यातही अधिक गंमत म्हणजे हे फोटो डेव्हलोप होऊन आपल्या हातात येण्याची वाट बघत बसायला नको.

माणसांचंही तसंच काहीसं झालं आहे. आता माणसांशी संवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता नाही. आता पत्र, तार वगैरे पाठवावं लागत नाही. तर मोबाइलद्वारे झटपट बोलता येतं. मेसेज पाठवता येतात. आणि आता तर व्हॉट्स ऍप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, ईमेल्स इत्यादीद्वारे आपल्याला ईमोकेशन्ससहित संभाषण करता येतं.

किती सगळं सोयीस्कर झालं आहे, विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ! जग फार जवळ आलं आहे. Mass Communication जे म्हणतात ते आज खऱ्या अर्थाने होत आहे. पण अधिकाधिक डिजिटल होण्याच्या नादात आपण आपल्यातील माणूसपण गमावत आहोत का? माहित नाही. काहीजण म्हणतात की संगणकामुळे कित्येक कागदांची बचत होते परिणामी पर्यावरणाचा सांभाळ होतो. पण संगणकासाठी आणि इंटरनेटसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचं काय? आपण आज बैलगाड्या, घोडेगाड्या इत्यादींऐवजी ट्रेन्स, बस, चारचाकी, दुचाकी, तीनचाकी , विमान यांचा उपयोग करतो. याने अर्थात आपला बहुमूल्य वेळ वाचतो. पण याने पर्यावरणाचा ऱ्हास  नाही का होत? सोशल मीडियाने माणसं जवळ आणली आहेत की दुरावली आहेत, आप्तांपासून आणि स्वतः पासून, हा प्रश्नच आहे. आज केवळ सोशल मीडियावर फोटो अपडेट करायचे म्हणून फोटोज काढणारे कितीतरी आहेत. ( मीही कॉलेजमध्ये असताना काढायचे, हे मला इथे मान्य करायला हवं.) सोशल मीडियामुळे लोक फार व्यक्त होऊ लागले आहेत. व्यक्त होऊ लागले आहेत की केवळ प्रतिक्रिया देऊ लागले आहेत, हाही प्रश्न मला पडतो. मी समाजमाध्यमांच्या (सोशल मीडियाच्या) विरोधात नाही कारण मीही माझ्या आयुष्यात सोशल मीडिया वापरला आहे, अजूनही वापरते. पण मला तरीही जगाचं जे अवाजवी प्रमाणात डिजिटलायझेशन होत आहे ते कळत नाही. डिजिटलायजेशनच्या नादात आपण अधिकाधिक यंत्रवत तर होणार नाही ना? माझी ही भीती तुम्हाला कदाचित रास्त वाटत नसेल पण आपण यंत्रवत होत आहोत याचे अनेक पुरावे आपल्याला आजूबाजूला दिसत असतील. लहान मुलांचा लेखनाच्या वेगापेक्षा त्यांचा संगणकावर टाईप करण्याचा वेग आज जास्त आहे. त्यामुळे, बहुतांश काम संगणकावर करनूनही पेन आणि डायरीत रमणाऱ्या माझ्या जीवाला थोडी चिंता वाटते, आपली पुढची पिढी कागद आणि पेन विसरणार नाही ना? पुस्तकांचा सुगंध घेणं तर विसरणार नाही ना?.  जशी पाटी-पेन्सिल विसरली आहे ?

मी विज्ञानाच्या, आधुनिकीकरणाच्या, प्रगतीच्या विरोधात नक्कीच नाही पण मानवी आयुष्याचं जे झपाट्याने संगणकीकरण होत आहे, ते मनाला कोठेतरी खटकतं.

अधिक प्रेम आणि शुभेच्छांसह,
दीप्ती शा. आ. शिंदे
  

Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"