शिदोरी

हा हा म्हणता २०१८ संपलंही. २०१८ चा आज शेवटचा दिवस. उद्यापासून २०१९ साल सुरू होणार. 

या नवीन वर्षाच्या सर्वांना सर्वात आधी अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. येणारं हे साल आपणा सर्वांना सुख, समृद्धी, आनंद, सुयश, प्रेम, शारीरिक-मानसिक-बौद्धिक-भावनिक-अध्यात्मिक-आर्थिक संपन्नतेचं जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

आज अगदी सकाळपासूनच सोशल मीडियावर नवीनवर्षाभिनंदनाचे मेसेजेस फिरत आहेत. सर्वच जण २०१८ च्या गोड-कटू सर्वच आठवणींना उजाळा देत आहेत. माझ्याही मनात २०१८ चा फ्लॅशबॅक तरळून गेलाच. मी खूप काही पाहिलं, अनुभवलं आणि शिकले. 

आपण प्रत्येकच जण आपापल्या आयुष्यात काहीनाकाहीतरी नेहमी शिकत असतो. मलाही या वर्षात बरंच काही शिकायला मिळालं. त्यातलेच काही अनुभव मला थोडक्यात मांडायचे आहेत. 

खरं तर, प्रेम-देव-कर्म या सर्वांवरच माझा लहानपणापासून विश्वास आहेच. माझ्या घरच्यांनी, शिक्षकांनी, मित्र-मैत्रिणींनी आणि एकूणच माझ्या वातावरणाने मला जे काही घडवलं आहे त्यामुळे प्रेम-देव-कर्म या तिन्हींवर माझा आधीपासूनच दृढ विश्वास आहे. पण या वर्षात मला या तिन्ही शक्तीचं सामर्थ्य नव्याने अनुभवायला मिळालं. आपण आपलं कर्म करत राहावं. फळाची अपेक्षा करू नये, हे भग्वदगीतेतील वाक्य मी माझ्यात बाणवण्याचा सहेतु प्रयत्न करत आहे. आपण सर्वच जण जाणतो, अपेक्षा हे सर्व दुःखाचं मूळ आहे. त्यामुळे आपण आपल्या अपेक्षा कमी करण्यातच आपलं खरं शहाणपण आहे. मी हेच शहाणपण स्वतः त रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण , माझा हेतू स्पष्टआहे, मला एक आनंदी आणि समाधानी आयुष्य जगायचं आहे. आणि आनंद व समाधान माणसाला फक्त तेव्हाच मिळू शकतं  जेव्हा तो आपल्या गरजा आणि अपेक्षा कमी करतो, आपले प्राधान्यक्रम ठरवतो. प्रेम ही माझ्यासाठी सर्वांत महान शक्ती आहे. माझ्यासाठी प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही.  देव, प्रेम आणि विश्वास हे जणू मला समानार्थी शब्दच वाटतात. ह्या तिन्ही बाबी परस्परावलंबी आहेत, असं मला वाटतं. आपण प्रत्येक कर्म प्रेमाने करावं, विश्वासाने करावं म्हणजे सुयशरूपी-समाधानरूपी-आनंदरूपी ईश्वराची प्राप्ती जरूर होते, हे मला नव्याने उमजलं आहे. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट या वर्षात मी शिकले ती म्हणजे, आपण स्वतःला बौद्धिक, भावनिक, वैचारिक, शारीरिक आणि मानसिक पातळीवर जेवढं लवचिक  ठेवू तेवढं चांगलं आहे. उगाच एखाद्या गोष्टीला चिकटून राहण्यापेक्षा, एखाद्या गोष्टीचा हट्ट करत बसण्यापेक्षा कधीकधी 'लेट गो' करणं खूप गरजेचं असतं. काहींना 'लेट गो' करणं  म्हणजे परिस्थितीपुढे नमतं घेण्यासारखं वाटतं पण ते नेहमीच बरोबर असतं असं नाही. कारण बऱ्याचदा वैश्विक शक्तीकडे आपल्यासाठी खूप सुंदर योजना असतात, ज्या बहुतेक वेळा आपल्या आकलनाच्या पलीकडे असतात. त्यामुळेच, आपण आपलं कर्म करत राहावं आणि फळ ईश्वरावर सोपवावं, हे मला तंतोतंत पटतं. 

तिसरी महत्त्वाची गोष्ट मी शिकले ती म्हणजे सर्वच माणसं समान नसतात. प्रत्येकाकडून आपण समान वर्तनाची अपेक्षा करूच शकत नाही. कारण प्रत्येकजण हा त्याच्यावरच्या विविध संस्कारांतून घडलेलं एक शिल्प आहे. यामुळे प्रत्येकाकडून आपण समान वर्तनाची अपेक्षा करूच शकत नाही. आणि परिणामी एकमेकांची एकमेकांशी तुलनाही करू शकत नाही. आपण जर एकमेकांची तुलना करत राहिलो तर प्रत्येकातील वैविध्य आपण उमजूनच घेऊ शकत नाही आणि परिणामी वैश्विक शक्तीने त्याच्या अतुलनीय सर्जनशीलतेने जी विविध शिल्पं घडवली आहेत त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करण्याच्या अमोल आनंदापासून आपण लांब राहू.  

अजून बरंच काही शिकता आलं आहे. पण सगळंच इथे मांडणं कदाचित शक्य नाही. म्हणून ब्लॉग जरा आवरते. 

क्षमस्व. 

पण तुम्ही मात्र २०१८ मध्ये तुम्हाला काय काय शिकता आलं यावर जरूर विचार करा. कारण ज्ञानाचा आपण आपल्या भावी वर्षात आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षात उपयोग करू शकतो आणि आपलं आयुष्य अधिक आनंदी आणि सुकर बनवू शकतो. काय, पटतंय ना? 


पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 


काळजी घ्या. 
- दीप्ती शा. आ.  शिंदे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"