"तीळगुळ घ्या,गोड गोड बोला..."

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना आपण नेहमी "तीळगुळ घ्या, गोड गोड बोला", असं म्हणतो. पण आपण नेहमी गोड बोलतो का? आणि गोड बोलणं म्हणजे नेमकं काय? यावर थोडसा विचार करावासा वाटला आणि म्हणून हा लेख.

"गोड गोड बोला"चा अर्थ अनेक जण आपापल्या सोयीने काढू शकतात. पण मला अभिप्रेत असलेला अर्थ मी इथे मांडते.

गोड बोलणे म्हणजे केवळ गोड बोलणे नव्हे तर जे खऱ्या अर्थाने नात्यात, माणसात, मनात, हृदयात, विचारात, भावनेत आणि जगात माधुर्य, प्रेम, आनंद, शांती आणि समाधान निर्माण करू शकेल असं बोलणं. 'गोड बोलणे' याचा अर्थ कोणीही खोटं बोलणं किंवा समोरच्याचे मन रिझवू पाहील असं उगाच दिखाऊ गोड बोलणं असा मुळीच घेऊ नये. कारण वरकरणी उगाच दाखवण्यासाठी गोड बोलणं याला काहीच अर्थ नसतो.

गोड बोलण्याची उपरोल्लेखित व्याख्या कृतीत उतरवणं खरं तर खूप कठीण आहे पण अशक्य मात्र नाही. दैनंदिन जीवनातीलच उदाहरणं घ्या ना. आपण ठरवतो, की मला कोणाशी भांडण तंटा करायचा नाही, मला गोड वागायचं आहे पण आपण घराबाहेर पडतो. ट्रेनमध्ये चढतो. आणि इवल्याश्या जागेवरून डब्ब्यात भांडणं होतात. लोक अक्षरशः अर्वाच्य शिव्या वगैरे घालून भांडतात. त्यातून थोडे ना थोडे शांत होतो तोच ऑफिसमध्ये बॉसचं काहीतरी बोलणं ऐकावं लागतं आणि घरी आल्यावर घरच्यांवर आगपाखड होते. आणि त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मनात आणलेला गोड बोलण्याचा संकल्प आपण खरंच 'सोडून देतो'.

पण मग यावर उपाय काय? आपल्यापैकी बरेचजण म्हणतील की समोरचा जर वाकड्यात शिरला तर आम्ही का गप्प रहावं. आम्हाला त्रास झाला तर आम्ही का सहन करावं. बरोबर आहे. मीही म्हणते, का सहन करावं. पण मला असं वाटतं की आपण समोरच्याच्या वागण्याला उग्र प्रतिक्रिया न देता शांत राहूनही आपलं मत मांडू शकतो, आपली मनस्थिती जराही ढळू न देता.
मानसशास्त्रज्ञ नेहमी म्हणतात,'प्रतिक्रिया देऊ नये तर प्रतिसाद द्यावा'.

आता प्रतिक्रिया देऊ नये आणि प्रतिसाद द्यावा म्हणजे काय? उदाहरण देते. समजा एखाद्या जोडप्यामध्ये जरा काहीतरी मतभेद झाले. नवऱ्याला आणि बायकोला एकमेकांचे मुद्दे पटले नाहीत. तर समजा त्यांनी आपापले मुद्दे पटवून देण्यासाठी एकमेकांना शिवीगाळ केली, एकमेकांची कधीकाळची उणीदुणी काढली, एकमेकांच्या हेतूंवर संशय घेतला आणि हे सर्व व्यक्त करताना खूप आकांततांडव केला तर ही झाली प्रतिक्रिया. आणि याच उदाहरणाबाबत प्रतिसाद म्हणजे - तेच नवरा बायको समजा व्यवस्थित समोरासमोर बसले, त्यांनी एकमेकांचे मुद्दे नीट मनमोकळेपणाने समजून घेतले, एकमेकांच्या मतांचा आदर केला, जे समोर आहे फक्त त्यावर बोलले आणि कोणाच्याही कधीकाळच्या चुका उकरून काढल्या नाहीत आणि नम्रपणे व खुल्या मनाने त्यांनी जर संवाद साधला तर तो झाला प्रतिसाद. हे सर्व फार पुस्तकी किंवा फार आदर्शवादी वाटत असेल. आहेच हे फार पुस्तकी आणि आदर्शवादी, एखाद्या परीकथेत शोभण्यासारखं. पण कल्पना करा, जर आपण खरंच असं वागू शकलो तर आयुष्यात गोडवा नाही का बरं निर्माण होणार.

मी आजपासून सर्वांशी 'अशा प्रकारच्या गोड' बोलण्याचा विचार करत आहे - जिथे मी स्पष्ट आणि गोड दोन्ही बाजू सांभाळू शकेन. तुम्हीही असाच काहीसा विचार करताय का?

"तीळगुळ घ्या, गोड गोड बोला."

मकरसंक्रांतीच्या हार्दिक आणि मधुर शुभेच्छा.

-दिप्ती शा. आ. शिंदे

Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"