स्वातंत्र्य आणि कर्तव्य...

आज प्रजासत्ताक दिन. या निमित्ताने माझ्या परिसरात झेंडावंदन झालं. यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी आपापले विचार मांडले, लहान लहान गोष्टींतून आपण देशसेवा कशी करू शकतो, ह्यावर प्रकाशझोत टाकला. ह्याच विचारांवर थोडसं मंथन करावसं वाटलं म्हणून हा लेख.

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण सोशन मीडीयावर एकमेकांना भरभरून शुभेच्छा देतो. आपल्यापैकी बरेचजण झेंडावंदनही करतात. पण तिथे आपलं आपल्या देशाप्रतीचं कर्तव्य संपतं का? खरं तर तिथे आपल्या कर्तव्यांची सुरुवात होते.

मला कधीकधी काहीकाही प्रश्न पडतात जसे की - आपल्यापैकी प्रत्येकजण मतदान करतो? आपल्यापैकी प्रत्येकजण वीज वाचवतो? सार्वजनिक वाहनांतून उतरताना आपण पंखे बंद करतो? प्रत्येकवेळी तिकीट काढून प्रवास करतो? सार्वजनिक नियमांचं पालन करतो? आपापली कामं कर्तव्यदक्षतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतो? या आणि अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं जर 'हो' म्हणून मिळाली तर अभिनंदन, 'हजारो प्राणांच्या बलिदानाने मिळालेलं  स्वातंत्र्य अनुभवण्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला अधिकार आहे'.

आजही देशाच्या संरक्षणासाठी अनेक जवान शत्रूपासून सीमेचं रक्षण करत आहेत. देशांतर्गत सुरक्षेसाठी अनेक पोलीस अहोरात्र झटत आहेत. आपणही सर्वांनी सैन्यदलात किंवा पोलीसदलात भरती होण्याची गरज नाही. पण किमान आपापली कामं आपण जर जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडली तरी तीही देशसेवाच आहे ना? कोणतही काम हाती घेताना आणि करताना त्याचा देशाच्या हितासाठी कसा उपयोग होईल, हा विचार मनात असणं म्हणजे देशाप्रतीच्या आपल्या कर्तव्याची आपल्याला जाणीव असणं.

मी फक्त काही तासांचा पुस्तकरूपी अभ्यास शिकवण्यासाठी इथे नसून जीवनावश्यक संस्कार आणि मूल्यं प्रदान करण्यासाठीही आहे, हा विचार प्रत्येक शिक्षकाच्या मनात असणं हीही देशसेवाच आहे ना? माझ्याकडे औषधासाठी आलेल्या कोठल्याही रूग्णाला यथोचित औषधोपचार करून त्याला बरं केलं पाहिजे असं मानणारा आणि तसं वागणारा प्रत्येक डॉक्टरही देशसेवकच आहे ना? मला आखून दिलेल्या परिसरात शांतता आणि सुव्यवस्था नांदत राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि प्रयत्नशील आहे असं आचरण असणारा प्रत्येक पोलीस, जवान, राजकारणी हे देखील देशसेवकच आहेत ना? 

थोडक्यात काय तर आपापली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारा प्रत्येकजण हा देशसेवकच आहे. आणि जर आपण आपापली कर्तव्य बरोबर पार पाडत नसू तर ते राष्ट्रहिताचं नाही हेही तितकंच खरं. भारतीय तत्वज्ञानाने जगाला दिलेल्या कर्मयोगाचंही हेच तर म्हणणं आहे की आपण आपापली कर्तव्यं नीट पार पाडावीत.

स्वातंत्र्य हा फक्त आनंद नाही, ती एक जबाबदारी आहे. स्वातंत्र्य फक्त अधिकार घेऊन येत नाही तर आपल्यासोबत अनेक कर्तव्यही घेऊन येतं. आपल्याला आज हे स्वातंत्र्याचे दिवस दिसत आहेत पण त्यासाठी ज्या ज्या महान-थोर नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्याप्रमाणे सदैव राष्ट्राच्या हिताचा विचार मनात असणं, जोपासणं आणि त्यासाठी झटणं हीच खरी देशसेवा.

चला, कर्तव्य आणि प्रेमबुद्धीने देशहितासाठी तत्पर होउयात.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिप्ती शा. आ. शिंदे

Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"