कान्हा!
कृष्ण या 'शक्ती'बद्दल आणि भगवद्गीतेबद्दल माझ्या मनात विशेष आणि तीव्र कुतुहूल किंवा जिज्ञासा पाच-सहा वर्षांपूर्वी एका भाषणानिमित्ताने निर्माण झाली. लहानपणी 'श्रीकृष्ण' आणि 'महाभारत' मी पाहिलं आहे, अगदी आवडीने पाहिलं आहे आणि तेव्हाही कृष्णाबद्दल एक सकारात्मक प्रतिमा माझ्या मनात होती पण आता माझ्या मनात असलेली कृष्णाची प्रतिमा तुलनेने अधिक खोल, व्यापक आणि ठळक आहे.
पाच-सहा वर्षांपूर्वी मला एके ठिकाणी एक भाषण करायचं होतं आणि त्यासाठी मी 'भगवद्गीता आणि मानसशास्त्र (Psychology)' हा विषय निवडला. त्यानिमित्ताने ऑनलाईन उपलब्ध असणारे काही लेख मी वाचले. जगभरातून विविध अभ्यासकांनी कृष्णावर, भगवद्गीतेवर आणि आणि त्याचा मानसशास्त्राशी कसा संबंध आहे यावर कमालीचा अभ्यास केला आहे.
मी वाचलेल्या एका लेखात, कुरुक्षेत्रावर सर्व शस्त्रं खाली टाकून निराश झालेला अर्जुन म्हणजे आताच्या भाषेत कसा depressed होता आणि त्याला युद्धासाठी तयार करणारा, प्रोत्साहन आणि उर्जा देणारा कृष्ण, याच्यात आणि आजच्या समुपदेशकांत (Therapists/counsellors) कसं साधर्म्य आहे, यावर भाष्य केलं होतं. कृष्णाने सांगितलेली गीता म्हणजे मानसशास्त्रावरचा जणू आद्यग्रंथच म्हणावा लागेल असं स्वतः व. पु. काळे यांनी त्यांच्या 'आपण सारे अर्जुन' या पुस्तकात म्हटलं आहे. खरंच आहे, 'भगवद्गीता' हा जगातील सर्वच प्रश्नांवरचा अंतिम उपाय आहे, असं मलाही मनोमन वाटतं. गीतेत जे आहे तेच तर आमच्या मानसशास्त्रातील REBT, CBT, Behaviour Therapy मध्ये आहे. मनाचा हा गुंता युगानुयुगे चालू आहे. मग ह्या गुंत्यावर युगंधर उपाय नाही देणार तर कोण?
'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' म्हणणारा आणि ते सर्वांत रुजवण्याचा प्रयत्न करणारा श्रीहरि अजून किती, किती बरं गोष्टी शिकवतो! प्रेम, मैत्री, नीति, समाजकारण, राजकारण, व्यवहारकुशलता, धीरोदात्तता, कर्तव्यपूर्ती, सद्बुद्धीमत्ता, माया, दया, मृदुता आणि गरज पडेल तिथे कठोरता ह्या सर्व मूल्यांचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे 'कृष्ण'...
ओशो यांचे कृष्णावतील विचार हे खूप वाचनीय आणि चिंतनीय आहेत. ते विचार वाचताना किंवा वाचल्यावर कृष्णाच्या प्रेमात न पडणारा माणूस दुर्मिळ म्हणावा...
कृष्ण आणि त्याची गीता समजणं अधिक सोपं आहे म्हणता म्हणता ते कठीण वाटतं आणि कठीण आहे म्हणता म्हणता अधिक सोपं वाटतं. कृष्ण आणि गीतेची खोली, व्याप्ती, शक्ती ही आजवर कोणाला समजली आहे, हे त्या सावळ्या हरिलाच माहित.
काल कृष्णजन्माष्टमी झाली आणि आज गोपाळकाला... मुंबईभरातून अनेक देखावे, रथ रस्तोरस्ती फिरत होते, दहीहंड्या फोडल्या गेल्या... आनंद आहे. माणसं कृष्णाला आजही विसरली नाहीत आणि कधी विसरणारही नाहीत हे सत्य आहे. पण कृष्णाने शिकवलेली मूल्यदेखील आपण जपली तर त्याला अधिक आनंद आणि समाधान वाटेल, असं मनापासून वाटतं...
जय श्रीकृष्ण!
- दिप्ती शा. आ. शिंदे
Comments
Post a Comment