दमलेल्या पालकांची कहाणी........





                                    मध्यंतरी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचं, 'दमलेल्या बाबाची कहाणी तुला' हे गाणं ऐकण्याचा योग आला. या गाण्यात कामाच्या भारामुळे आपल्या मुलीला वेळ न देऊ शकणारया वडिलांच्या मनातली खंत, तळमळ, वेदना उत्कृष्टपणे संगीतकारांनी श्रोत्यांसमोर आणली. खर तर, ही गोष्ट फक्त त्या गाण्यापुरती मर्यादित नाही. आज आपल्या आजूबाजूला आपल्याला असे अनेक आई-बाबा दिसतील ज्यांना  आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यांच्यासोबत चार गोष्टी करण्यासाठीही वेळ नाही. आणि त्यामुळेच आजकालचे बरेच ऑफिस गोईंग स्त्री - पुरुष पालक असमाधानी दिसतात.
                                  
                                  याच विषयावरचा एक लेख वाचनात आला. ऑफिसला जाणारया पालकांना आपल्या पाल्याकडे हवं तितकं लक्ष आणि वेळ देता येत नाही,या विषयावर हा लेख होता. ह्या लेखात जी आकडेवारी मांडली होती त्यानुसार एका सर्वेक्षणात असं दिसण्यात आलं की, आजच्या युगातील बहुसंख्य नोकरदार पालक, त्यांना स्वतःच्या मुलांसोबत हवा तितका वेळ घालवायला मिळत नाही म्हणून असमाधानी आहेत. या सर्वेक्षणातील ९१%पालकांनी असं  मत व्यक्त केलं  की ते त्यांच्या पाल्यांसोबत वेळ घालवतात पण यातीलच ५५% पालकांनी असं म्हटलं की हा वेळ समाधानकारक नाही.थोडक्यात काय तर आजचे नोकरदार पालक (पुरुष आणि स्त्रिया दोन्ही) आपल्या पाल्यासोबत त्यांना जास्त वेळ घालवता येत नसल्याने असमाधानी आहेत. या सर्वेक्षणातून  दिसून आलेली एक छान बाब म्हणजे या पालकांपैकी जवळजवळ ६०% पालक असंही मानतात, की आईबरोबरच मुलाच्या बाबांनीही त्याच्यासोबत वेळ घालवण, त्याच्याकडे लक्ष देण खूप गरजेचं आहे. या सर्वेक्षणात भारतातील चार महानगरांमधील ( मुंबई,दिल्ली,कोलकाता,चेन्नई ) पालक सहभागी झाले होते.
                           
                                  आजकालच्या धावपळीच्या - धकाधकीच्या आयुष्यात,मंदीच्या काळातही आपली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी, नोकरीत पगारवाढ किंवा बढती मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबाला अधिकाधिक आर्थिक सुबत्ता मिळवून देण्यासाठी  बरेचजण स्वतःला झोकून देऊन काम करतात.कॉर्पोरेट जगतात तर कामासाठीच्या डेडलाईन्स        
तंतोतंत पाळाव्या लागतात,खर तर त्या पाळण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो.आणि नोकरी जरी नऊ ते पाचची असली तरीदेखील बरयाचदा काम घरी आणल जात आणि घराचंही नकळतच ऑफिस होऊन जात. आणि मग मुलाबाळाना वेळ कधी आणि कसा द्यायचा हा प्रश्न निर्माण होतो.मुंबई,दिल्ली ईत्यादी मेट्रोसिटीजमध्ये तर  आई-बाबा आणि मुलं याचं दिवसातील चोवीस तासांपैकी फारातफार ३ /४ तासच एकमेकांशी संबंध येत असेल.( कधीकधीतर त्याहूनही कमी ) बऱ्याचदालहान मुलं तर त्यांच्या आजी-आजोबांकडेच लहानाची मोठी होतात किंवा पाळणाघरात वाढतात. साहजिकच यामुळे आईबाबांची हवी तितकी जवळीक निर्माण होत नाही. आणि भावनिक जवळीक नसल्याने सुसंवादही होत नाही. सुसंवाद नाही म्हणून आई-बाबा आणि मुलं एका छताखाली राहूनही एकमेकांना नीट समजून घेऊ शकत नाही आणि मग नात्यांमध्ये विनाकारण दरी निर्माण होते. ऑफिसवरून दमून-भागून आलेले जीव संध्याकाळी बऱ्याचदा मुलांच्या आयुष्यात दिवसभरात घडणारया गोष्टी, त्या गोष्टींचा मुलांवर झालेला परिणाम हे जाणून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. आई ऑफिसवरून घरी आल्याआल्या घरकामाला लागलेली असते. ऑफिसगोईंग आई तर 'सुपरमॉम' असते. पण घर-दार सांभाळून पुन्हा मुलाना वेळ देण्यात या सुपरमॉमच्या नाकी नऊ आलेले असतात.त्यांमुळे तिलाही मनात असूनही फारसा वेळ देण नाही जमत.मग मुलांनी बोलायचं कोणाशी? मुलांचे लिसनिंग बोर्ड्स होणार तरी कोण? विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजकाल बऱ्याचशा कुटुंबात आजी-आजोबाही नसतात. मग उरतो पर्याय फक्त मित्र-मैत्रिणींचा. आणि इथेच सुरवात होते क्लोस्ड अशा 'peer  attachment' ची.मुलं मित्र-मैत्रिणींसोबत जास्त वेळ  घालवायला लागतात.


                                                या सर्व बाबीत दोष खर तर कुणा एकाचाच नसतो तर तो सर्वांचा आणि मुख्यत्वे करून आजकालच्या जीवनपद्धतीचा ,बदलत्या काळाचा असतो. बहुतेकदा मनात असूनही अनेक पालकांना आपल्या पाल्याला वेळ देता येत नाही. मग अशा वेळी मुलांकडे लक्ष देण म्हणजे केवळ ते दिवसभरात कोठे जाणार आहेत? कोणाला भेटणार आहेत? पोचलास की कॉल कर. घरी पोचलीस की मेसेज सेंड कर, असं होउन जात. आणि नकळतच पालकांची काळजी ही पहाऱ्यात बदलून जाते.

                                                 पण मग या दुष्ट्चक्रावर उपाय काय? यावर एक छान लेख इंटरनेटवर माझ्या वाचनात आला. त्यात अमेरिकेतल्या एका ऑफिस गोईंग महिलेने घर-दार सांभाळून पालकाना आपल्या पाल्यांना जास्तीतजास्त वेळ कसा देता येईल यासाठी तिने काही टिप्स दिल्या होत्या. रात्रीच्या वेळी जेवण एकत्र घेण, जेवतेवेळी टी.व्ही. न लावण, त्याऐवजी दिवसभरातल्या घडामोडींवर चर्चा करणं, रविवारी किंवा आठवड्यातून कधी सुट्टी मिळाल्यास बाहेर फिरायला जाणं आणि त्यावेळीही विविध विषयांवर चर्चा करणं, एकत्र वृत्तपत्रवाचन कारण आणि त्यातील बातम्यांवर चर्चा करणं इत्यादी अनेक उपाय करता येतील, ज्यायोगे पालक आपल्या पाल्यांसोबत Quantitatively  आणि Qualitatively  जास्त वेळ घालवू शकतात. 

Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"