दुर्मिळ नाती...
आयुष्यात कधी कोण कोणत्या रूपात भेटेल हे सांगता यायच नाही. काही काही माणसाना भेटल्यानंतर अस वाटत की आपण याना आधीपासून ओळखतो. ती आपल्याला खूप जवळची वाटतात. त्यांच्यात काहीतरी अस असत जे आपल्याला त्यांच्याजवळ ओढत आणि त्यांच्याशी बांधून ठेवत. अशा माणसांशी आपल गतजन्माच काही नात असाव, काहीतरी ऋणानुबंध असावा अस वाटत. त्या माणसाना सतत भेटावस वाटत, त्यांच्याशी सतत संवाद साधावासा वाटतो. विचारानी आणि भावनानीही का असेना पण त्यांच्या सतत संपर्कात राहावस वाटत.
अशा व्यक्तींबद्दल आपल्या मनात एक हळवी आणि मृदु जागा असते जी आपल्याला नितांत जपून ठेवावीशी वाटते. अशांबद्दल आपल्या मनात पराकोटीचा समंजसपणा आणि क्षमाभाव असतो. त्यांच्याबद्दल प्रेम असत. एक नितळ भावना असते. त्यांच सर्वार्थाने चांगलच व्हाव अशी जगतनियंत्याकडे कळत किंवा नकळत प्रार्थना केली जात असते.
काही माणसे अशीच असतात ज्यांचा प्रत्यक्ष सहवास हवाहवासा वाटतो. प्रत्यक्षात शक्य नसेल तर निदान वैचारिक आणि भावनिक सहवास तरी निरंतर रहावा अस वाटत. त्यांचा आधार वाटतो. त्यांची सुखदुःख आपल्याला आपली वाटतात. त्याना सतत आनंदाचा परिस्पर्श व्हावा आणि त्यानी दुखापासून सदैव लांब असाव अस वाटत.
काही माणसे अशीच असतात ज्यांच्याशी आपण विचारानी आणि भावनानी एकरूप होतो. अशी द्वैत गळून पडलेली नाती खरी सुंदर, ज्यांत अहंभाव नसतो, ज्यात गर्व नसतो, ज्यात मतमतांतरे असली तरीही समोरच्याप्रती नितांत आदरभाव असतो. ज्यात आरोप प्रत्यारोप नसतात. ज्यात असतो फक्त समंजसपणा आणि प्रेम ... निखळ, निर्व्याज प्रेम... अशी नाती फारच लोभस, नाही का?
आजकालच्या स्पर्धायुगात अशी नाती गवसण फारच दुर्मिळ पण जर अस एखाद जरी नात गवसल तर ते टिकवून ठेवणच आपल्या हिताच,नाही का ?
- दिप्ती शा. आ. शिंदे
Comments
Post a Comment