गुहा...
त्या तिथे पलीकडे एक गुहा आहे
हो, एक गुहा आहे
आणि मला तिथे जाण्याची इच्छा आहे
सुरू केला मी प्रवास एका असीम आणि अनामिक इच्छेपायी
एका नावेत बसले मी
संततधार पावसात मृदू हेलकावे खात ती नाव पल्याड पोहोचली
मी उतरले
अनवाणी पायांना माझ्या तेथील खडीयुक्त मातीचा स्पर्श झाला
मी चालू लागले
थोडे अंतर चालताच मी अरण्यात प्रवेश केल्याचं उमगलं
धास्ती वाटली काहीशी
पण इच्छा प्रबळ होती, गुहेत पोहोचण्याची
त्या इच्छेच्या जोरावर मी चालत राहिले
आजूबाजूला गर्द झाडी होती
पायाला खडी टोचत होत्या
एक काटाही रूपला
पण मी चालत राहिले
गुहा अजून काहीशा अंतरावरच होती
मी ध्येयपीसाट होऊन चालत होते
आणि अचानक,
अचानक समोर एक सर्प दिसला
काळाकुट्ट,लांब...
त्याला पाहताक्षणीच मी थंड पडले, क्षणभर घाबरले
पण त्याच माझ्याकडे लक्ष नसाव कदाचित
एक कोठल्यातरी अवर्णनीय आणि अगम्य तंद्रीत तो पुढे गेला, फुत्कारत...
मी सुटकेचा निःश्वास सोडला आणि पुढे चालू लागले
कानावर काही अनोळखी आवाज पडत होते
अरण्यातील हिंस्र श्वापदांचे असावेत
मी कानाडोळा केला आणि पुढेच जात राहिले
आणि ठराविक अंतरानंतर मला ती गुहा दिसली
मी हर्षून गेले...
मी गुहेजवळ पोहोचले
प्रवेशाजवळून मी आत डोकावून पाहिले
आत काळाकभिन्न अंधार होता
मी पुन्हा घाबरले
आजूबाजूच्या पहाडाचा आधार घेत मी आत शिरले आणि चालत राहिले
मला आतील ऊष्मा जाणवत होता
मला घाम सुटला, उष्म्याने आणि भीतीनेही
पण मी चालतच राहिले
आणि काही क्षणातच मला मंद प्रकाश जाणवला
त्या प्रकाशाच्या सहाय्याने मी पुढे सरसावले
आणि समोर बघते तो काय,
कोणी एक ध्यानस्थ साध्वी साधनेत मग्न होती
मला तिचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला
उत्सुकतेपोटी मी पाऊल पुढे टाकलं
आणि मला जाणवलं की हा चेहरा खूप ओळखीचा आहे
एका असीम, अबोध काळापासून मी ह्याला ओळखतेय
मी कोड्यात पडले
बाजूच्या नक्षीदार समईच्या मंद प्रकाशात मी माझ्या प्रश्नाच उत्तर शोधू लागले
आणि क्षणार्धात उमगलं की
ह्या चेहऱ्याला तर रोज मी आरशात पहाते
जाणून हे माझ्या चेहर्यावर स्मित उमटलं
एक प्रदीर्घ शोध संपल्याची जाणीव त्यात होती...
Comments
Post a Comment