'तो' आणि 'मी'...

जगात निर्व्याज आणि शुद्ध प्रेमाने ओतप्रत भरलेली नाती फार दुर्मिळ असतात आणि पर्यायाने अशी दुर्मिळ नाती लाभलेली माणसंही दुर्मिळ असतात. असंच एक नातं मला काही वर्षांपूर्वी गवसलं. आता त्याला काही वर्षांपूर्वी गवसलं असं म्हणणंसुद्धा मला समर्पक नाही वाटत कारण जेव्हा केव्हा मी त्या नात्याचा विचार करते तेव्हा असं वाटत की हे नातं खूप काळापासून माझ्यासोबत आहे... बर्याच वर्षांपासूनच नव्हे तर नक्कीच कैक जन्मांपासून माझ्यासोबत आहे आणि या आमच्या नात्यातील 'तो' माझ्यासोबत आहे, बराच काळ, बरेच जन्म, एका अनादि काळापासून...आणि अनंत काळापर्यंत 'तो' माझयासोबत असेल, याची मला खात्री आहे. ग्वाही 'तो'च मला देत असतो, देत आलाय, अनादि अनंत काळापासून, त्याच्या प्रत्येक कृतीतून, आविष्कारातून, अभिव्यक्तीतून... 

त्याने आतापर्यंत प्रत्येक सुखदुखात माझी साथ दिलीय, देतो आणि सदैव देत राहील. तो माझ्यासोबत हसतो,रडतो... आम्ही एकत्र मस्ती करतो, खट्याळपणाही करतो आणि धम्मालही... तस बघायला गेलं तर 'तो' सदैव माझ्यासोबत असतो... सावलीसारखा नाही म्हणणार मी कारण सावलीसुद्धा सुडून जाते आपल्याला, अंधारात. पण 'त्या'ने मात्र अंधारातही मला साथ दिलीय. खर तर तो अंधारातही माझा दीपस्तंभ झालाय, प्रत्येक वेळा. 'त्या'ने माझ्या आयुष्यातील प्रत्येक तिढा सोडवलाय. पण याबदल्यात माझ्याकडे कधीच कसली अपेक्षा नाही केली. माझा प्रत्येक योग्य हट्ट तो पुरवतो. माझी प्रत्येक कथा ऐकतो, कधीही न कंटाळता. सदैव, अविरतपणे मला ऐकून घेणं आणि तेही शांतपणे त्याला कस जमत, मला नाही माहीत. पण मला याचं खूप आश्चर्य आणि छान वाटतं की तो सदैव माझ्यासोबत असतो. 

'तो' कसा दिसतो, तेही मला माहीत नाही. पण मी त्याला अजून भेटले नाहीये, असं मी नाही म्हणू शकत. आम्ही एका विशिष्ट माध्यमातून एकमेकांना भेटतो आणि  संवाद साधतो. आम्ही एकमेकांचे कोण आहोत मला माहीत नाही आणि सर्व काही आहोत हेसुद्धा माहीत आहे. 'तो' आणि 'मी', आम्ही एक अतूट साथ आहोत, अभेद्य आणि दुर्दम्य.   

त्याचं माझ्यावरचं प्रेम अतूट आहे, अखंड आहे, विशाल आहे, अगणित आहे, या विश्वाप्रमाणे व्यापक आहे. मुळात माझ्यासाठी 'तो'च 'प्रेम' आहे. तो माझी शक्ती आहे आणि भक्तीही. तो माझं सर्व काही आहे. या अनमोल दुर्मिळ नात्यासाठी त्याने माझी निवड केली यासाठी मी त्याची ऋणी आहे, त्याच्याप्रती कृतज्ञ आहे.  

आमचं नातं खरं तर शब्दातीत आहे, माझ्यासाठी माझं विश्व आहे आणि इतरांसाठी कदाचित तितकंच अनाकलनीय आणि गूढ आहे... 

व्यक्तिरेखा - 
तो = 'तो' 
मी = 'मी' 


Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"