माझी मायबोली
'भाषा' फक्त व्यवहाराचे माध्यम नसतात. त्या संस्कृतीच्या वाहकही असतात, असं मला मनोमन वाटतं. आपली संस्कृती जेवढी समृद्ध तेवढी आपली भाषा समृद्ध आणि जेवढी आपली भाषा समृद्ध तेवढी आपली संस्कृती समृद्ध, असं मला एक वर्तुळाकार समीकरणच वाटतं. आणि याच समीकरणाच्या आधारावर मला हे म्हणताना अतिशय आनंद होतो, माझी मायबोली- माझी मराठी ही भाषा आणि संस्कृती म्हणून समृद्ध आहे.
मराठीचा मुद्दा हा माझ्यासाठी प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, ऋणानुबंधांचा, अस्मितेचा, संस्कृतीचा, अभिमानाचा आणि आनंदाचा मुद्दा आहे.
माझं स्वतःचं शालेय शिक्षण मराठी भाषेतून झालं. नाही म्हणायला माझं आठवीपासून सेमी इंग्रजी माध्यम होतं. पण ईश्वरी कृपेने मला शाळेत आणि महाविद्यालयात खूप चांगले शिक्षक आणि प्राध्यापक मिळाले आणि ज्यांच्यामुळे मी आज मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांतून संवाद साधू शकते. मीच काय, माझ्या परिचयात असे अनेकजण आहेत की ज्यांचं मराठीतून शालेय शिक्षण पूर्ण झालं आहे आणि आज ते इंग्रजीतून उत्तम संवाद साधू शकतात. त्यामुळे, मराठीतून शिकून आमच्या मुलांचं काय भवितव्य, असा प्रश्न विचारणाऱ्या पालकांना काय म्हणावं हे मला कळत नाही.
इंग्रजी भाषा आज केवळ व्यवहाराचे माध्यम राहिलेली नसून ती एक Status symbol झाली आहे. जवळपास सर्वच पालक आपापल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण देण्यासाठी धडपडताना दिसतात. इंग्रजी मह्त्वाची आहे, नक्कीच आहे. पण मला नाही वाटत की अमृताशीही पैजेत जिंकणाऱ्या मराठीहून ती मह्त्त्वाची आहे.
आज मुंबईत जी मराठीची जेमतेम परिस्थिती आहे ती आपल्यामुळेच. केवळ सरकारला दूषणं देऊन फायदा नाही. आपणच आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवून द्यायचे आणि मुंबईत मराठी माणूस उरला नाही, मराठी उरली नाही म्हणून आरडाओरड करायची, ह्याला अर्थ नाही. मी इंग्रजी भाषेला दोष नाही देत. भाषा म्हणून तीही संपन्नच आहे. मला इंग्रजीही प्रिय आहे. मी स्वतः इग्रंजीतून लिहिते, बोलते, वाचते पण मातृभाषेच्या अस्तित्वाची किंमत मोजून परकीय भाषांचा उदोउदो करणं माझ्या मनाला रुचत नाही. आज इंग्रजी भाषा केवळ व्यवहाराची भाषा म्हणून उरली नसून ती एक गरज बनली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे मराठी शाळांची दुर्दशा, पर्यायाने पालकांचा मराठी शाळांबद्दल तयार झालेला दुषित दृष्टीकोन, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, परप्रांतीयांचे लोंढे इत्यादी अनेक कारणे मराठीच्या आजच्या 'जेमतेम' परिस्थितीस कारणीभूत आहेत.
आपण ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करू शकतो? आज समाजमाध्यमांसारखं एक प्रभावी शस्त्र आपल्या हातात आहे. आंतरजालावर आणि समाजमाध्यमांवर आपण मराठीतून अधिकाधिक लेखन करू शकतो. उत्तम मराठी बोलण्याचा प्रयत्न करू शकतो. मराठी साहित्यिकांना मराठीतून साहित्यनिर्मिती करण्यास प्रवृत्त करू शकतो. फक्त घरातच नाही तर सार्वजनिक ठिकाणीही मराठीतून संवाद साधू शकतो. मराठी संस्कृती समजून घेऊन तिचा आपापल्यापरीने प्रचार व प्रसार करू शकतो.
आणि शासकीय पातळीवर काय प्रयत्न होऊ शकतात? तर सरकार सर्व गरजू मराठी शाळांना अनुदान देऊ शकते . मराठी शाळांचे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण करू शकते. सर्व शासकीय कामे मराठीतूनच पार पाडली जावीत. मोठमोठ्या उद्योगसमूहांना आपण मराठीशी जोडले पाहिजे. मराठी भाषेतून रोजगारनिर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी अनेक नवनवीन कल्पनांना वाव दिला पाहिजे.
हे सर्व मुद्दे फक्त माझेच नाहीत तर मराठी भाषादिनानिमित्त मी एक लघुसंशोधन केलं. त्या दरम्यान मला माझ्या प्रश्नावलीला जे प्रतिसाद मिळाले त्या प्रतिसादांच्या आधारे मी ह्या लेखातील काही मुद्दे मांडले आहेत. ज्या ज्या व्यक्तींनी माझ्या लघुसंशोधनात भाग घेतला त्यापैकी प्रत्येकाने मराठीच्या जतन आणि संवर्धनानासाठी वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. कुणी म्हणालं की आम्ही शक्यतो प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेतूनच बोलणार. कोणी म्हणालं की आम्ही मराठीतून पुस्तकनिर्मीती करणार. कोणी म्हणालं की आम्ही एकमेकांना मराठी पुस्तकं भेट म्हणून देणार. मला या सर्वच मंडळींचे आभार मानायचे आहेत ज्यांनी मला हे लघुसंशोधन पार पाडण्यास मदत केली.
प्रिय वाचकांनो, माझा इंग्रजी भाषेवर राग नाही, मनात द्वेष नाही. भाषा म्हणून तीही मला प्रियच आहे. पण तिचा उदोउदो करण्यापायी आपण आपल्या मातृभाषेची कुचंबणा तर करत नाही ना, हा प्रश्न फक्त आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारण्याची गरज आहे. आपल्याला आपली मराठी फक्त आपल्या घराच्या चार भींतींपुरतीच मर्यादित ठेवायची आहे का, हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. ज्या मातृभाषेतून आपण आपल्या आयुष्यातील पहिले बोबडे बोल बोललो तिच्या जतन आणि संवर्धनासाठी आपण सदैव तत्पर असलं पाहिजे. अर्थात हा माझा दृष्टीकोन झाला. आपण सर्व आपापल्या परीने व मनानुसार विचार करण्यास स्वतंत्र आहात व सक्षमही आहात.
आता कुणाला माझ्या ह्या शब्दांतून भाषावादाचा दर्प येण्याआधी केवळ मातृभाषेच्या प्रेमापोटी लिहिला गेलेला हा लेख आटोपते.
राजभाषा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दिप्ती शा. आ. शिंदे
मराठीप्रेमी
Comments
Post a Comment