आनंदी गोपाळ - एक संस्कारमय अनुभव

आनंदी गोपाळ - एक संस्कारमय अनुभव

मी 'आनंदी गोपाळ' पहावा, असं मला खूप जणांनी सुचवलं होतं. आणि आज मी 'आनंदी गोपाळ' पाहिला.
आणि अजूनही मी भारावलेल्या अवस्थेत आहे. चित्रपट पाहताना बरेच विचार मनात घुमत होते असं म्हणणं जरा अतिशयोक्ती ठरेल कारण चित्रपटाचा प्रभावच इतका आहे की चित्रपट पाहताना आपण कोठल्याही विचारचक्रात गुंग व्हावं अशी आपल्याला तो परवानगीच देत नाही
पण चित्रपट पाहताना दाटून येतात त्या अनेकविध भावना. तत्कालात स्त्रीशिक्षणाचा आग्रह धरणारे गोपाळराव आणि त्यांचं स्वप्न मनाशी बाळगून ते फुलवणार्या, आधी त्यांच्यासाठी आणि मग स्वतःसाठी व देशासाठी, आनंदीबाई. त्यांची ही स्फूर्तिदायक कथा पाहताना ह्या जोडप्याबद्दल मनात अभिमानाच्या अनेक लाटा उसळून गेल्या, ज्या अद्याप थांबलेल्या नाहीत.

आनंदीबाई म्हणजे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर, हे मला ठाऊक होतं पण ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी गोपाळराव आणि आनंदीबाईंना किती संघर्ष करावा लागला, अंतर्गत आणि बहिर्गत पातळीवर, याची अतिशय समर्पक आणि सुयोग्य प्रकारे जाणीव आज झाली.

'आनंदी गोपाळ' हा केवळ चित्रपट नसून तो एक संस्कारपट आहे कारण आनंदीबाई-गोपाळराव यांचा संपूर्ण प्रवास संस्कारदायी असाच आहे.

स्वतःचं मूल गेल्यानंतर एखादी आई जशी खचते तशाच आनंदीबाई खचतात पण त्या तिथेच अडकून पडत नाहीत. त्या त्यांचं दुख कवटाळून बसत नाहीत. त्या अशाही वेदनादायी परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहतात, समाजाचा विचार करतात आणि डॉक्टर होण्याचा ध्यास धरतात. हेच त्यांचं असामान्यत्व. आणि मुळात त्यांच्यात शिक्षणाची गोडी रुजवणारे गोपाळराव. शतकापूर्वी केवढी बरं दूरदृष्टी दाखवावी एखाद्या माणसाने! पत्नीसाठी एखादं स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करण्यासाठी तिला सर्वतोपरी मदत करणं, आधार देणं, हे वंदनीय आहे.

दोघांनाही त्यांच्या ध्येयपूर्ततेच्या प्रवासात अनेक अडथळे पार करावे लागले पण प्रत्येक अडथळ्यावर त्यांनी जिद्दीने मात केली आणि अखेर आपलं ध्येय प्राप्त केलंच. बऱ्याचदा परिस्थिती नाही तर तिच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन तुम्हाला घडवत असतो, तुमच्यासमोर परिणाम सादर करत असतो, तुम्हाला चांगले-वाईट अनुभव देत असतो. मानसशास्त्रात एक उपचार पद्धती आहे, जिला आम्ही REBT म्हणतो, म्हणजेच Rational Emotive Behavioural Therapy. ह्या उपचारपद्धतीच्या मते, एखादी घटना आपल्याला सुख किंवा दुख देत नाही तर तिच्याकडे आपण कसे पाहतो, त्या घटनेला कशी प्रतिक्रिया देतो, ती प्रतिक्रिया आपल्याला सुख किंवा दुख देत असते. घटना इतकी मह्त्वाची नसते, जितका आपण तिच्याबद्दल काय विचार करतो, तो विचार मह्त्त्वाचा असतो. आनंदीबाई आणि गोपाळरावांनी असाच तत्कालीन परिस्थितीबाबत, त्यांच्यावर ओढवलेल्या दुखाबाबत सकारात्मक विचार केला. दुखालाही त्यांच्यासमोर मान झुकवावी लागली. अशा उत्तुंग स्थितप्रज्ञतेचा चित्ररूपी आविष्कार एखाद्याला संस्कारमयी नाही वाटला तरंच आश्चर्य.

'आनंदी गोपाळ'बाबत अजून बरंच काही लिहिण्यासारखं आहे. एक चित्रपट म्हणून सगळ्या गोष्टी उत्तम जमून आल्या आहेत. चित्रपटात अनेक बारकावे अचूकरित्या टिपले गेले आहेत. अभिनय, संगीत, लेखन, छायाचित्रण, संकलन, दिग्दर्शन सर्व सर्व उत्तम. धन्यवाद समीर विद्वांस, ललित, भाग्यश्री आणि संपूर्ण टीम, हा उत्तम जीवनपट उलगडून दाखवण्यासाठी.

'आनंदी गोपाळ'च्या निमित्ताने सर्वांना आपापल्या आयुष्याची दिशा मिळो आणि ध्येयप्राप्तीसाठी बळ मिळो, ही सदिच्छा.

- दिप्ती शा. आ. शिंदे

Comments

Popular posts from this blog

Yeh dil bole,"no extra!"

Purpose...

"India is my country"