जगी सर्व सुखी असा कोण आहे?


सुमीतने 3BHK घर घेतलं, ते पाहून अमितला त्याचं 2BHK घर लगेच लहान वाटू लागलं. विजयाच्या मुलीला 91% टक्के मिळाले, ते कळताच स्नेहाला तिच्या मुलीला मिळालेले 89% कमी वाटू लागले. अशी एक ना दोन अनेक उदाहरणं देता येतील. आपण सदैव आपली इतरांशी तुलना करत राहतो.

Social comparison नावाची एक सुंदर संकल्पना Social Psychology मध्ये आहे. त्यात दोन लघुसंकल्पना अंतर्भूत आहेत - Upward social comparison आणि Downward social comparison.

Upward social comparison मध्ये माणूस त्याच्या मते त्याच्याहून जे अधिक श्रेष्ठ, कर्तृत्ववान, यशस्वी किंवा आनंदी आहेत, त्यांच्याशी तुलना करतो. पण अशी तुलना करणाऱ्यांमध्ये दोन गट येतात. एक गट जो अशी तुलना यशस्वी व्यक्तीकडून अधिकाधिक प्रेरणा मिळावी, यासाठी करतो आणि आपल्या आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी तत्पर होतो. आणि दुसरा गट मात्र अशी तुलना करून, इतरांचं सुख, आनंद, सुयश, श्रेष्ठता पाहून स्वतःला कमी लेखतो आणि स्वतःला दूषणं लावत बसतो, हताश होतो.

Downward social comparison मध्ये माणूस त्याच्या मते जे कनिष्ठ, कमी कर्तृत्ववान, कमी यशस्वी किंवा अयशस्वी, दुःखी आहेत, त्यांच्याशी तुलना करतो. अशी तुलना करणाऱ्यांमध्येही दोन गट असतात. एक गट आपल्यापेक्षा तथाकथित कनिष्ठ लोकांना पाहून स्वतःबद्दल अभिमान बाळगू लागतो; त्याच्या वागण्यात - बोलण्यात आत्मप्रौढी येते आणि इतरांबद्दल तुच्छतेची भावनही जाणवू लागते. तर दुसरा गट इतरांपेक्षा स्वतःला अधिक श्रेष्ठ, आनंदी, यशस्वी पाहून स्वतःला अधिक भाग्यवान समजू लागतो. पण त्याच्यात गर्व नसतो तर परमशक्तीबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल कृतज्ञताभाव असतो. 

अशा प्रकारची तुलना करणं हे फारच मनुष्यसुलभ आहे, नैसर्गिक आहे. पण यावर आपलं नियंत्रण असायला हवं. आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांना पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घेता येणं जमलं पाहिजे. इतरांना आनंदी पाहून, यशस्वी पाहून आपल्यालाही आनंद वाटायला हवा. इतरांचं सुख मोजताना आपण आपलं दुःख अधोरेखित करू नये. मानवी जीवनाचा एक नियम आहे - आपण ज्या गोष्टीवर अधिक लक्ष आणि मानसिक व शारीरिक ऊर्जा खर्च करतो, त्या गोष्टी वृद्धिंगत होतात. पण जर आपण आपलं दुःखच कुरवाळत बसलो तर आनंदाला आपलं दार ठोठवायला संधीच मिळणार नाही.  

आणि आपल्याहून तथाकथित कनिष्ठ व्यक्तींना पाहून आयुष्याबद्दल आणि परमशक्तीबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता यायला हवी, पण स्वतःबाबत गर्व निर्माण होता कामा नये. प्रत्येकजण आपापल्या परीने आपली प्रगती करत असतो. प्रत्येकाची जडणघडण वेगळी, प्रत्येकाच्या प्रेरणेचे स्रोत वेगळे, प्रत्येकाला मिळणारं पोषक वातावरण वेगळं, प्रत्येकाची बुद्धीमत्ता वेगळी, प्रत्येकाची मानसिकता वेगळी. मग हे सगळे घटक निरनिराळ्या प्रमाणात आपल्यात असताना आपण तथाकथित कनिष्ठ व्यक्तींबद्दल तुच्छभाव का दाखवावा?

ब्लॉग पूर्ण करताना एवढंच म्हणेन की आपण तुलना करावी, जरूर करावी... पण त्या तुलनेने आपण स्वतः किंवा कोणी दुसरा दुखावता कामा नये, आपलं किंवा कोणी दुसऱ्याचं मानसिक खच्चीकरण होता कामा नये.

तुम्हाला काय वाटतं?

©दिप्ती शिंदे दळवी
९ जानेवारी, २०२२


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Moments of Reflection...

प्रेम म्हणजे ...

3 Ls...