प्रेम म्हणजे ...
मी बहुतेक व्हाट्स ऍपवर वाचलं होत. - एखाद्या गोष्टीवर प्रेम असणं आणि ती निव्वळ आवडणं यात फरक तो काय ? उत्तर होत, जेव्हा तुम्ही झाडावरचं गुलाब तोडता आणि त्याचा वास घेता, तेव्हा तुम्हाला ते आवडलेलं असतं पण जेव्हा तुमचं त्याच्यावर प्रेम असत तेव्हा गुलाबाच्या झाडाला दररोज पाणी घालता.
किती सोप्या भाषेत सांगितलं आहे सांगणाऱ्याने. नाही का?
मला ही व्याख्या किंवा हे स्पष्टीकरण खरंच खूप भावलं. आपलं जेव्हा खरंच एखाद्यावर प्रेम असतं तेव्हा आपण त्या गोष्टीची किंवा त्या व्यालतीची विशेष काळजी घेतो. तिला जीवापाड जपतो. तिला कोणत्याही गोष्टीमुळे त्रास तर होणार नाही ना, वेदना तर होणार नाही ना यासाठी आपण सतत तत्पर असतो. त्या व्यक्तीसाठी किंवा त्या गोष्टीसाठी काहीही करायला तयार असतो, अगदी कोणताही त्याग. त्या व्यक्तीचा/ गोष्टीचा आपल्याला ध्यास जडलेला असतो. दिवसरात्र आपण फक्त तिचाच विचार करत असतो. तिच्याबद्दल स्वप्नरंजन करत असतो. आपलं भविष्य तिच्याबरोबर रंगवत असतो.
पण असं प्रेम आपण कोणावर किंवा कशावर करतो किंवा करायला पाहिजे?
असं प्रेम आपण कोणावरही करू शकतो. आपले आई-बाबा, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारचं एखादं लहान मूल किंवा अगदी कोणीही... कुणाला दिवसरात्र बागेतील झाडं झुडूपांची निगा राखण्यात आनंद मिळत असतो. कुणासाठी तबल्याच्या साथीवर 'ता थै थै तत्'चा ठेका धरण्यात सर्वस्व गवसत असतं. कुणाला 'सा रे ग म प' आळवण्यात परमानंद मिळत असतो. कुणाला गोलंदाजाने फेकलेल्या प्रत्येक चेंडूवर षटकार लगावण्यात धन्यता प्राप्त होत असते. सीमेवर दिवसरात्र पहारा देणारा जवान सुद्धा देशावर प्रेमच तर करणारा असतो. निवडणुकीच्या दिवशी इतर जण सुट्टीचा आनंद उपभोगत असताना वोटिंग बूथवर जाऊन मतदान करणाऱ्याचही लोकशाहीवर प्रेमच असेल, नाही का? अवघ्या खेळण्या बागडण्याच्या वयात सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा करून ती साकार करणारे शिवराय, त्यांचही स्वराज्यावर प्रेमच तर होत. ही सगळी प्रेमाचीच तर उदाहरणं आहेत.
मूळ मुद्दा काय? प्रेम कोणावर करावं आणि किती करावं याला काही मर्यादा नाही. ते तुम्ही कोणावरही आणि कशावरही आणि मुख्य म्हणजे कितीही करू शकता. तुम्हाला कोणी अडवणार नाही. फक्त ते तुम्ही हृदयपासून आणि खरं खरं करताय ना एवढंच महत्त्वाचं असत... नाही का?
प्रेम म्हणजे शरीराचं, मनाचं, हृदयाचं, विचारांचं किंवा भावनांचं परावलंबन नव्हे किंवा या सर्व गोष्टींचं पारतंत्र्य नव्हे. उलटपक्षी, प्रेम तुम्हाला स्वातंत्र्य देत, स्वावलंबी कास व्हायचं ते शिकवत. प्रेम तुम्हाला जगण्याची ऊर्जा आणि प्रेरणा देतं. प्रेम तुम्हाला योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, पवित्र -अपवित्र, डावं -उजवं या सगळ्यांच्या पल्याड नेत. जिथे तुम्हाला फक्त आनंद मिळत असतो. एका पोस्टमध्ये वाचलं होत - 'लव्ह इस द ऍबसेन्स ऑफ जजमेंट'. खरंच हे पटतं मला. जेव्हा तुम्ही प्रेमात असता ना तेव्हा तुम्ही समोरच्याबद्दल कोणतही मत बनवत नाही. तुम्ही फक्त त्या व्यक्तीच्या/ त्या गोष्टीच्या सहवासाचा आनंद उपभोगत असता. तुमची प्रिय व्यक्ती जर चुकत असेल तर तुम्ही तिचा त्याग करत नाही, तुम्ही तिला सांभाळून घेता, तुला जपता, तिच्या भल्याचीच ईश्वराकडे प्रार्थना करता.
माझ्यासाठी प्रेम म्हणजे सर्व प्रश्नांवरचा एकमेव उपाय आहे. जिथे प्रेम आहे तिथे सर्व प्रश्न माझ्यासाठी संपतात. कारण प्रेम म्हणजे निव्वळ आनंद. जिथे खरं प्रेम आहे तिथे दुःख, त्रास असूच शकत नाही आणि निर्माण झालं तर फार काळ टिकूच शकत नाही. प्रेमात पडलेली किंवा प्रेमभंग झालेली मंडळी बरयाचदा दूषणं देतात आणि पुन्हा प्रेमात पडायला, पुन्हा कोणालातरी जीव लावायला घाबरतात. पण इथे एक गोष्ट समजून घ्यायची गरज आहे, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्या व्यक्तीबरोबर राहणं कदाचित आपल्यासाठी अयोग्य असू शकत पण त्या व्यक्तीवर प्रेम करणं आपल्यासाठी अयोग्य नाही असू शकत. (अर्थात आपल्याला आपल्या प्रेमाची तीव्रता कधीकधी कमी करावी लागते). माणसं प्रेमात पडायला घाबरतात कारण त्यांना अपेक्षाभंगाचं, प्रेमभंगाचं भय वाटत असतं. पण असं असेल तर यात प्रेमाचा काय दोष? मुळात अपेक्षा ठेवून, स्वार्थ ठेवून प्रेम करताच येत नाही कारण जिथे स्वार्थ आहे तिथे प्रेम असूच शकत नाही. प्रेम म्हणजे केवळ देणं, काहीतरी मिळण्याची अपेक्षा न करता...प्रेमात तुमची समोरच्या व्यक्तीवर किंवा समोरच्या गोष्टीवर मालकी नसते. तुमचं त्या व्यक्तीवर / गोष्टीवर निव्वळ प्रेम असत...
प्रेम या विश्वाचं आदिम आणि अंतिम रूप आहे जे जगण्याचं ध्येय नसावं, ते जगण्याची शैली असावी...
Comments
Post a Comment