चला लहान होऊयात, निरोगीपणे...
उर्जिताकडून आज ऑफिसमध्ये सगळे पार्टि मागत होते. का?... आज बालदिन म्हणून. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीकडून बालदिनाची पार्टि कशासाठी? ऍक्च्युअली उर्जिता थोडी... थोडी म्हणजे बऱ्यापैकी कमी उंचीची आहे आणि तिचं वागणं बऱ्यापैकी... बर्यापैकी म्हणजे अगदीच बऱ्यापैकी लहान मुलांसारखं आहे. म्हणून तिच्याकडे आज सगळे पार्टि मागत होते. पण स्मार्ट उर्जिताने सगळ्यांची मागणी फार हुशारीने डिफ्युज करून टाकली.
उर्जिता. एक मनमोकळं, निखळ व्यक्तिमत्व... लहान मुलांसारखं... जे काही असेल ते तोंडावर बोलून मोकळं होणार. कोणाची भीडभाड नाही. हा, पण ते बोलताना अदबीने बोलणार, समोरच्याचा मान राखून. कोणाला काही हवं असेल तर कशाचीही पर्वा न करता मदतीचा हात पुढे करणार. राग आला की तो पटकन व्यक्त करून मोकळं होणार पण तो नंतर मनात ठेवणार नाही. जितका पटकन तिला राग येतो तितकंच डोळ्यात पटकन पाणीही येतं. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणार. लोकांची थट्टा - मस्करी करणार पण कोणाला लागेल असं काही बोलणार नाही. कसं बरं जमतं वयाच्या २३ -२४ व्या वर्षीही इतकं मनमोकळं होऊन जगणं?
एकदा चित्रा, उर्जिताची कलीग, बोलता बोलता म्हणाली," मी लग्नाआधी उर्जितासारखी होते. अशीच अल्लड, निर्धास्त आणि बिनधास्त." तिच्या बोलण्यातला 'सेन्स ऑफ लॉस' कळण्याइतपत ठळक होता.
तुम्हालाही कोणी कधी म्हटलंय का, की तू तुझ्या वयापेक्षा मोठ्या माणसासारखा / माणसासारखी वागतोस / वागतेस? तुम्ही एखादी गोष्ट मनाला लावून घेता का, फार काळासाठी? कोणाच्या बोलण्याचा फार विचार करत बसता का? फार काळासाठी हताश होऊन बसता का? यातलं काहीही जर खरअसेल ना, तर बिलिव्ह मी, तुम्हाला 'लहान' होण्याची गरज आहे.
तुम्ही म्हणाल की, आम्ही काही लहान मुलं अशीही पाहिली आहेत जी, उद्धट असतात, फारच बदमाश असतात, बेजबाबदार असतात. मग तू लहान व्हा असं म्हणतेयस ते नेमकं कोणत्या प्रकारचं लहानपण? तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. पण थांबा . मी तुम्हाला उलगडून सांगते.
मी तुम्हाला आणि मलाही, आपण 'निरोगी लहान मूल' व्हायला विनवत आहे. आता निरोगी लहान मूल कसं बरं असतं ? इथे मला फक्त शारीरिकदृष्ट्या निरोगी असं लहान मूल अपेक्षित नाहीये, तर मानसिक दृष्ट्याही निरोगी असं मूल अपेक्षित आहे.
माझ्या मते, निरोगी मुलाला खूप प्रश्न पडतात. ते फार चिकित्सक असतं. त्याला नवीननवीन शोध घ्यावेसे वाटत असतात. त्याला शिकण्याची, नवीन काहीतरी जाणून घेण्याची उर्मी असते. ते फार निर्मळ असतं, खरोखरच झऱ्याच्या पाण्याप्रमाणे. त्याच्या मनात भ्रातृभाव (आणि भगिनीभावही) उपजत असतो. ते खूप खट्याळ असतं. पण ते खट्याळ असूनही संवेदनशीलही असतं, अगदी आपल्या पौराणिक कथांमधील कृष्णाप्रमाणे... त्याच्यात खूप ऊर्जा असते. आता अर्थात ह्या पैलूला आपल्यातील 'वयस्क' व्यक्तिमत्वाने योग्य दिशा द्यायला हवी. लहान मूल जरी लहान असलं ना तरीही त्याच्यात एक प्रकारची नैसर्गिक परिपक्वता असते ज्याला एक प्रकारच्या निष्पापपणाची झालर असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मूल आपल्याला लवकर लळा लावतं. त्याच्या असण्याने घरात चैतन्य असतं . तुम्हाला काय वाटतं? असंच असतं ना आपल्याला हवं हवं असणारं लहान मूल. हे वर्णन ऐकल्यावर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर तुमची लहानपणीची मूर्ती आली असेल, बरोबर ? मग वाट कसली बघताय? असंच, अगदी असंच आपण होऊयात, परत एकदा. गेलेलं बालपण कदाचित परत येणार नाही. पण आपण आपल्यातील जे लहान मूल गमावून बसलोय ते परत मिळवूयात.
आजच्या बालदिनी फक्त लहान नको होऊयात तर जरा चांगल्याप्रकारे, निरोगीप्रकारे लहान होऊयात.
अगदी उर्जिताप्रमाणे !
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
- दीप्ती शा. आ. शिंदे
Comments
Post a Comment